हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची एका कॉलवर माहिती, वॉररुम गंभीर रूग्णांच्या मदतीला आले धावून
पाच महिन्यांपासून अविरत सेवेत, शहरासह पर जिल्ह्यातील रूग्णांना मिळाला आधार
विनोद सावंत / कोल्हापूर
महापालिकेच्या वॉररुममुळे कोरोनाच्या तब्बल 4900 रूग्णांना जीवदान मिळाले. प्रकृती गंभीर असताना शिल्लक बेड कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, याची माहिती एका फोनवर देण्याचे महत्वाचे काम वॉररुममधून झाले. गेल्या पाच महिन्यांपासून ही सेवा सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 6 हजार 325 फोन कॉल आले असून अद्यपही सेवा सुरूच आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेला मार्च 2021 पासून सुरूवात झाली. एप्रिलनंतर प्रादूर्भाव वाढल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. गंभीर रूग्णाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारण्याची वेळ नातेवाईकांवर आली. यामध्ये रूग्ण दगावण्याचा धोका होता. यामुळेच रूग्णांना बेडसाठी विविध रुग्णालयात फिरायला लागू नये. यासाठी महापालिकेने महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहामध्ये वॉररुम सुरू केली. सरकारी, खासगी रुग्णालय आणि महापालिकेचे कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजनच्या रिक्त बेडची माहिती देण्याचे काम येथून करण्यात आले. एका फोनवर शिल्लक बेडची माहिती मिळल्याने संकटकाळात ही सुविधा कोरोना रुग्णांना जीवनदायनी ठरली. रूग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात काही अंशी हा उपक्रम महत्वाचा ठरला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बेडच्या माहितीसाठी कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटक येथूनही फोन आले.
वॉररुम सुरू- 7 एप्रिल 2021
आतापर्यंत आलेले फोन -6325
बेड मिळालेले रूग्ण-4900
कामकाज वेळ-24 तास
कर्मचाऱ्यांच्या शिप्ट-3
एकूण कर्मचारी -12
वॉररुमचा फोन नंबर- 2545473, 2542601
शिक्षक बनले कोरोना योद्धा
महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची वॉररुममध्ये नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून येणारा प्रत्येक कॉल स्विकारला जात असून रूग्णाची सविस्तर माहितीच्या आधारे कुठे बेड उपलब्ध आहेत, याची माहिती दिली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून ते अखंड सेवेत आहेत.
सहा हजार पेक्षा जास्त फोन कॉल
महापालिकेने मार्चपासून 24 तास वॉररुम सुरू केली. येथील कर्मचारी तिन शिप्टमध्ये काम करत आहेत. बेडच्या माहितीसाठी एप्रिल ते जुलै दरम्यान, रोज 100 पेक्षा जास्त फोन येत होते. सध्या येणारे रोज किमान 10 येतात. दुसऱ्या लाटेत 6325 फोन आले असून 4 हजार 900 रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात आले.
युवराज दबडे, समन्वयक, वॉररुम