तपासासाठी चौकशी समिती नियुक्त , पहाटेच्यावेळी दुर्घटना
जम्मू / वृत्तसंस्था
नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी जम्मू काश्मीर येथील सुप्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 8 जणांची ओळख पटवण्यात यश आले असून ते हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-कश्मीरचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींसह अन्य नेत्यांनी याबाबत दुःख व्यक्त करत वारसांना आर्थिक मदतीची घोषणा केली.
दरवर्षी नववर्षानिमित्त वैष्णोदेवी मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. येथे त्यांच्यासाठी विशेष सोयी देखील उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, शनिवारी सकाळी क्षमतेपेक्षा जास्त भाविक जमा झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. जम्मूच्या कटरामधील मंदिर परिसरात रात्री पावणेतीन वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाल्याचे सकाळी प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळपर्यंत बचावकार्य सुरु होते. मदत व बचावकार्यामुळे दुपारपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सोबतच घटनेतील मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मदत निधी आणि राज्य सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपये आणि जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारकडून मदत मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत.
माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात अचानकपणे झालेल्या या चेंगराचेंगरीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तथापि, या दुर्घटनेनंतर प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोना काळात एवढी गर्दी कशी झाली? गर्दी झाली तर सुरक्षेची व्यवस्था का नव्हती? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. आता घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे.
‘व्हीआयपीं’च्या एन्ट्रीनंतर चेंगराचेंगरी?
देवीच्या दर्शनासाठी काही व्हीआयपींनी प्रवेश केल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात जवानांनी लोकांना घाबरवल्याने चेंगराचेंगरी झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. दर्शन झाल्यानंतर परतत असताना पहाटे अडीज ते 3 वाजेच्या दरम्यान दर्शन करायला जाणाऱयांची आणि दर्शन करून परतणाऱयांची चेक पोस्ट 3 जवळ एकत्र गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे हिमांशू अगरवाल नामक भाविकाने प्रसारमाध्यमांना सांगितले. याचदरम्यान सीआरपीएफचे जवान गर्दी कमी कशी करता येईल याकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना धमकावून घाबरवण्यात मश्गुल होते. कुठला तरी व्हीआयपी येणार असून, त्याच्यासाठी रस्ता रिकामा करा असे म्हणत ते लोकांना धमकावत होते. त्यामुळेच घाबरलेले लोक पुढे-मागे करायला लागल्याने भाविकांची एन्ट्री पॉईंटवर झुंबड उडाल्याचेही त्याने स्पष्ट केले.









