लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा अधिकृतरीत्या समावेश करण्याचा निर्णय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. या निर्णयामुळे क्रिकेटच्या कक्षा आणखी ऊंदावणार असून, या खेळाला खऱ्या अर्थाने वैश्विक परिमाण मिळण्यास मदत होऊ शकेल. फुटबॉलनंतरचा लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. प्रामुख्याने राष्ट्रकुल परिवारात प्रसिद्ध असलेला खेळ अशी त्याची ओळख असली, तरी आता त्या पलीकडे जाऊन क्रिकेट पोहोचल्याचे दिसून येते. मागच्या काही वर्षांत क्रिकेटमध्ये प्रचंड स्थित्यंतर झाले आहे. कसोटी, वन डेनंतर आता ट्वेंटी-20 अर्थात झटपट क्रिकेटचा पर्याय चांगलाच स्थिरावल्याचे पहायला मिळते. मानवी जीवनाने आता वायूचा वेग धारण केला आहे. त्यामुळे कसोटी वा वन डेचा संपूर्ण सामना बघणे आजच्या काळात तसे अशक्यच. अशा या वेगवान युगात झटपट क्रिकेट सुसंगतच ठरते. त्यामुळेच मागच्या काही वर्षांत ट्वेंटी-20 या प्रारूपाने लोकप्रियतेचा कळस गाठलेला दिसतो. जागतिक स्तरावर अनेक लीग आयोजित केल्या जात असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पूर्वी क्रिकेट संघांची संख्या 10 ते 12 पर्यंत सीमित असे. आज आशिया, युरोपबरोबरच आफ्रिका, अमेरिकेतही क्रिकेटची क्रेझ वाढत आहे. अनेक संघ पुढे येत आहेत. अगदी महिला क्रिकेटलाही लोकप्रियता मिळताना दिसत आहे. त्यामुळे ऑलिंपिक समावेशाचे श्रेय झटपट क्रिकेटला द्यावेच लागेल. तसा शे-सव्वाशे वर्षांपूर्वी हा खेळ ऑलिंपिकमध्ये खेळवला गेल्याचा इतिहास आहे. मात्र, त्याचे तेव्हाचे वेळखाऊ स्वऊप पाहता ऑलिंपिकसाठी तो तसा गैरसोयीचाच होता. आता या खेळामध्ये बदल झाल्याने तो ऑलिंपिकमधील लक्षवेधक प्रकार ठरू शकतो. ऑलिंपिक स्पर्धा आणि त्यातील पदकास जगभरात एक वेगळा दर्जा आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न होते. तथापि, ऑलिंपिकमध्ये क्रिकेटला मान्यता नसल्याने संबंधित देशाच्या संघास वा क्रिकेटपटूंना या आनंदापासून वंचित रहावे लागत होते. आता त्यांना ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्याची संधी मिळू शकेल. तशी पाहिल्यास फुटबॉल व क्रिकेटची तुलना करणे अप्रस्तुत होय. जवळपास बहुतांश देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात फुटबॉल खेळले जाते. फुटबॉल विश्वकप हा म्हणून तर जगाचा क्रीडा उत्सव मानतात. असे असले, तरी तब्बल अडीच अब्ज चाहतावर्ग ही छोटी संख्या ठरू नये. आता ऑलिंपिकमधील समावेशाने क्रिकेटच्या वाढीसाठीही अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकेल. भविष्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे देश क्रिकेटकडे वळतील. त्यातून स्पर्धाही निर्माण होणार, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे गुणवत्ता वाढ व वर्चस्व टिकवितानाच भारतीय संघाची कसोटी लागेल. आजमितीला भारतात क्रिकेट हा सर्वाधिक रसिकप्रिय खेळ होय. क्रिकेट हा जणू या भूमीचा धर्म ठरावा, इतका येथील मातीत तो ऊजला, वाढला आहे. या खेळावर भारताचे आज 70 टक्के वर्चस्व आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा एकूणच जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे. त्यामुळे त्यांचा शब्द बऱ्याचदा अंतिम ठरतो. ऑलिंपिक प्रवेशासाठी आयसीसीने केलेल्या प्रयत्नांना बीसीसीआयचेही पाठबळ लाभले, हे लक्षात घ्यावे लागेल. क्रिकेट आणि अर्थकारण हाही महत्त्वाचा मुद्दा होय. ऑलिंपिकमधील समावेशाने याला अधिकची चालना मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पुढच्या काळात ऑलिंपिक प्रक्षेपण हक्कांसाठी मोठी स्पर्धा होऊ शकते. 2024 मधील पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतातील प्रक्षेपण हक्क दीड कोटी पौंडला विकण्यात आले आहेत. क्रिकेटच्या एन्ट्रीमुळे 2028 च्या स्पर्धेतील प्रक्षेपण हक्क 15 कोटी पौंडस्पर्यंत विकले जाऊ शकतात. प्रसारण हक्क कळस गाठणार, याचेच हे द्योतक म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला क्रिकेटच्या या स्थित्यंतरास विराट कोहली नावाचा भारतीय ब्रँडही निर्णायक ठरल्याचे सांगितले जाते. ऑलिंपिक समितीचे संचालक व माजी ऑलिंपिक विजेते निक्कोलो पॅम्पियानी यांनी बैठकीत यासंदर्भातील विराटच्या सर्वस्तरावरील लोकप्रियतेचा केलेला उल्लेख भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद म्हणावे लागेल. विराट हा संपूर्ण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे. सोशल मीडियावरील सर्व माध्यमातून त्याचे 34 कोटी फॉलोअर्स आहेत. ही संख्या ब्रोन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वूड्सपेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात येते. विराटच्या ऊपाने युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे अतिशय सक्षम असा डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याचेही पॅम्पियानी सांगतात. क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करत असताना विराटत्वाचा असा दाखला दिला जाणे, यातून विराटने या खेळात गाठलेली उंची ध्यानात यावी. भारतीय भूमीवर सध्या वर्ल्ड कप सामने सुरू आहेत. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानला धूळ चारत भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. वर्ल्ड कपची लढाई सुरू असतानाच क्रिकेटच्या ऑलिंपिक एन्ट्रीची बातमी येणे, हे आनंद द्विगुणित करणारे ठरते. गेल्या काही वर्षांत मुख्य राज्ये वा शहरांशिवाय इतर भागातूनही मोठ्या प्रमाणात टॅलेंट पुढे येत आहे. यापुढे याकरिता अधिक सकारात्मक वातावरण तयार होईल. याशिवाय ऑलिंपिकमध्ये हा खेळ कसा स्थिरावणार, याचीही सर्वांनाच उत्सुकता असेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्याचे नवे व आकर्षक प्रारूप पाहता क्रीडाशौकिनांची त्याला प्राधान्याने पसंती राहील, यात संदेह वाटत नाही. दुसरीकडे लॉज एंजेलिस ऑलिंपिकमधून बॉक्सिंगला वगळण्याचा निर्णय धक्कादायकच म्हटला पाहिजे. आर्थिक गैरव्यवहारामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता यापूर्वीच काढण्यात आली आहे. टोकिया ऑलिंपिकमध्येही आयओसीच्या स्वतंत्र नियंत्रणाखाली हा खेळ खेळविला गेला. मात्र, त्यानंतरही कोणतीही पावले न उचलल्याने हा निर्णय झाला आहे. यातून अंतिमत: खेळाडूंचेच नुकसान होईल. बाकी नव्या वैश्विक खेळपट्टीसाठी क्रिकेटला शुभेच्छा!
Previous Articleटाटा हॅरियर-सफारी 5 स्टार रेटिंगसह लाँच
Next Article नेदरलँडस्चा द. आफ्रिकेला दे धक्का!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








