धर्मादाय खात्याला दिले निवेदन : समाज ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
वैश्यवाणी समाज हा गोवा, कोकण, महाराष्ट्र येथून बेळगावात तसेच उत्तर कर्नाटकात गेल्या 300 वर्षांपासून स्थायिक झाला आहे. मात्र, वैश्यवाणी समाजाची अजूनही गॅझेटमध्ये नोंद झाली नाही. त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र देताना समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा वैश्यवाणी समाजाचीही गॅझेटमध्ये नोंद करावी, अशी मागणी वैश्यवाणी समाजातर्फे करण्यात आली आहे.
या समाजाची उत्तर कर्नाटकामध्ये 7 ते 8 हजार कुटुंबे आहेत. जवळपास 35 ते 40 हजार लोकसंख्या आहे. असे असताना अजूनही या समाजाची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. निवडणूक असो किंवा शाळेच्या दाखल्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा वैश्यवाणी समाजाची गॅझेटमध्ये नोंद करावी, तसेच ओबीसीमध्येच हा समाज समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली
आहे.
धर्मादाय विभागाचे तहसीलदार जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, दीपक कलघटगी, अमित कुडतरकर, सुरेश पिळणकर, परेश नार्वेकर, रवी कलघटगी, प्रवीण पिळणकर, महिला अध्यक्षा शीला बिडीकर, वर्षा शटवाणी, महादेव गावडे, निवृत्त पोलीस अधिकारी उमेश पांगम यांच्यासह समाजातील बांधव उपस्थित होते.









