प्रतिनिधी / वैराग
सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे वातावरण ढवळून निघाले असताना वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होण्याबाबत राज्य शासनाकडून प्रथम उद्घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वैरागकर ग्रामस्थांनी ह्या निवडणुकीत एकही फॉर्म न भरण्याचा निर्णय तिनही प्रमुख पार्टीसह ग्रामस्थांनी घेतला असुन नगरपंचायतीच्या प्रक्रियेला पाठींबा जाहीर केला आहे.
वैराग येथील ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये आज ग्रामस्थांच्यावतीने बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये गावाच्या हिताचा निर्णय म्हणून वैराग ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढली गेली तर वेळ, पैसा आणि सर्वांचे श्रम वाया जाणार आहेत तसेच निवडणूक शाखेवरही आर्थिक भार पडणार आहे म्हणून गावकरी मंडळी पार्टी प्रमुख्याने सध्याची ग्रामपंचायत निवडणूक न लढवता व कोणतेही फॉर्म न भरण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.
याबाबत तिनही पार्टीचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून प्रथम उद्घोषणा झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणूका घेऊ नयेत असे महाराष्ट्र शासनाने निवडणुक विभागाला कळवले आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तयार केला आहे या ग्रामपंचायतीच्या होणार आहे यामध्ये वैराग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याची प्राथमिक उद्घोषणा झाली असून यासंदर्भात आक्षेप मागवण्यात आले आहेत.
शासन निर्णय शासकीय उद्घोषणा नगर विकास विभाग क्रमांक एम यु एन २०२०/प्र .क्र .१४२/ नवि- १८ महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग 1 अ विभाग दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात यावी यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिध्द करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी पत्र काढले आहे.