मुरगूड / वार्ताहर
यमगे ता. कागल येथे वैरणीचा भारा घेऊन येताना पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. नामदेव दत्तात्रय मिसाळ वय ५० वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नामदेव मिसाळ हे गावाच्या दक्षिण टोकावर असलेल्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस वाण्याचे पठार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावरील पठारावर जनावरांकरीता वैरण आणण्यासाठी सकाळी ७. ३० वा. घरातून गेले होते. या पठारावरील स्वतःच्या मालकीच्या शेतातील वैरण कापल्यानंतर वैरणीचा भारा डोक्यावर घेऊन ते डोंगर उतारावरून गावाच्या दिशेने येत असताना सकाळी ९. ३० वा. च्या सुमारास त्यांचा पाय घसरल्यामुळे डोक्यावरील वैरणीच्या भाऱ्यासह ते खाली कोसळले. वर्मी लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेची वर्दी किरण वसंत पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली असून सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिपक मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.