प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती केली आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी नियुक्तीचे आदेश दिले.
12 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसानंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करणे अपेक्षित होते. सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार विभागातील अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली व्हाव्यात, अशी मागणी पुढे आली होती. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांची नावे चर्चेत आली होती. मात्र जिल्ह्यातील राजकिय वातावरण पाहता कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे दंडाधिकारी दर्जाचा अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असावा, असा मतप्रवाह पुढे आल्याने वैभव नावडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी या नियुक्तीचे आदेश दुग्ध विभागाला प्राप्त झाले.









