वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
वैभवनगरजवळील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला असलेल्या शांतेशा मोटर्स शोरुमच्या बाजूला असलेला बसथांबा मद्यपी व अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. तसेच दुरुस्तीविना बसथांबा मोडकळीस आलेला आहे. प्रवाशांविना कुचकामी ठरलेला हा बसथांबा अन्यत्र हलवून प्रवाशांची होणारी गैरसोय महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱयांनी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
शांतेशा मोटर्सजवळील सर्व्हिस रस्त्यावर उभारलेला हा बसथांबा मोडकळीस आला आहे. यामुळे भीतीने प्रवासी या बसथांब्यावर थांबत नाही. मागील बाजूचे पत्रे खाली पडल्यामुळे या ठिकाणी कुणी थांबत नाही. यामुळे हा बसथांबा कुचकामी ठरला आहे.
मद्यपींची सोय
सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला दारू दुकाने असल्यामुळे रात्रीच्यावेळी मद्यपी दारू आणून या ठिकाणी ढोसत आहेत. प्रामुख्याने बसथांबा मोडकळीस आल्यामुळे त्याचे अस्तित्व नाहिसे झाले आहे. यामुळे बसथांबा असूनसुद्धा प्रवासी वर्ग शांतेशा मोटर्स समोरील सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला थांबून बस प्रवास करत आहेत. नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे कुणी प्रवासी देखील बसथांब्यामध्ये थांबत नाहीत. यामुळेच मद्यपींची येथे सोय होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महानगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.









