कोल्हापूर : सुप्रसिद्ध डॉक्टर आण्णासाहेब चौगुले यांचे निधन
पेठ वडगाव / प्रतिनिधी
वैद्यकीय, शैक्षणिक, सहकार आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व आणि आण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक डॉ. आण्णासाहेब महादेव चौगुले यांचे रविवारी, ता. १३ सप्टेंबर रोजी कोरोनाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने पेठवडगाव नगरीचे भाग्यविधाते, सहकार-वैद्यकीय क्षेत्रातील एका बुजुर्ग आणि जाणकार व्यक्तिमत्वाला जिल्हा हरपला अशा शब्दांत अनेकांनी श्रद्धाजंली वाहिली. त्यांच्या निधनाने वडगाव शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर म्हणून डॉ. आण्णासाहेब चौगुले यांची ओळख होती.‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’ या भावनेने त्यांनी आयुष्यभर वैद्यकीय क्षेत्रात काम केले. समाजाच्या विविध क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांनी, सहकाराच्या माध्यमातून सामान्य लोकांची उन्नती साधावी या विचाराने ‘पेठवडगाव अर्बन बँके’ची स्थापना केली. त्यांनी पेठवडगावच्या विकासासाठी योगदान दिले. आण्णासाहेब यांचा पेठवडगावमध्ये चार सप्टेंबर १९२५ रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव तर माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात झाले.
वैद्यकीय शिक्षण पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये झाले.बी.जे.मेडिकल कॉलेजमधील पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. वडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या जन्मगावी पेठवडगाव येथे प्रॅक्टीस सुरू केली. दरम्यानच्या कालावधीत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, सहकारमहर्षी तात्यासो मोहिते, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्याशी त्यांचा चांगला स्नेह होता. त्यांच्या सहकार्यामुळे त्यांनी बँकीग क्षेत्रात पाऊल टाकले.
डॉ. चौगुले यांनी १९५७ मध्ये वडगाव अर्बन बँकेची स्थापना केली. १९७८ मध्ये हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणी सुरू केली. हातकणंगले तालुका सहकारी सूतगिरणीचेही ते संस्थापक होते. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या दोन्ही संस्था आज प्रगतीपथावर आहेत. सूतगिरणीमध्ये ४०० हून अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. वडगाव अर्बन बँकेचा विस्तार केला. शिरोळ, हातकणंगले,मिरज, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज या परिसरात मिळून वडगाव अर्बन बँकेच्या १५ शाखा कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक होते. जिल्हा बँकेवर दहा वर्षे संचालक म्हणून ठसा उमटविला.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर काम केले आहे. वडगाव नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून काम केले आहे. दरम्यान गेल्या चौदा दिवसा पासून कोरोनाशी झुंज देत असताना रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णादेवी, मुले डॉ. अमरनाथ, इंजिनीअर अजितराव, बालरोगतज्ज्ञ डॉ. अशोकराव चौगुले आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनी वरून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









