सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सरकारचा निर्णय : सीमेवर अडकून पडलेल्यांची घेणार दखल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमेवर अडकून पडलेल्यांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱया वैद्यकीय कर्मचाऱयांना आणि निमवैद्यकीय कर्मचाऱयांना पीपीई कीट, मास्क आणि सॅनिटायझर बाटल्या तातडीने पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जीवघेण्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी रविवारी दुपारी विधानसौधमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांचे सल्ले घेतल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी अथक परिश्रम घेणाऱया डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱयांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यावर सरकारने भर दिला आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर वैद्यकीय सुरक्षा साधने तातडीने पुरविण्यात येणार आहेत. सर्व जिल्हा आणि तालुका इस्पितळांना टेस्टींग कीट वितरीत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा यांनी निर्णयांची माहिती दिली. सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या उपयुक्त सल्ल्यांची अंमलबजावणी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेण्यात येणार आहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱया उपाययोजनांना विरोधी पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दर्शविला असून सहकार्य करण्यास संमती दर्शविली आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱयांसाठी ठोस भूमिका
संबंधितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची आणि उपचारानंतर पाठवून देण्याची व्यवस्था चोखपणे करण्यात येणार आहे. शेतकऱयांना कृषी उत्पादने, मालवाहतूक, विक्री आणि वितरण व्यवस्था करण्यात येईल. बियाणे, खत, किटकनाशकांचे वितरण करण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. रेशनकार्ड धारकांना रेशन घरपोच देण्याबाबत विरोधी पक्षाने दिलेल सल्ल्याबाबत विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
बैठकीत आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, डॉ. अश्वथ नारायण, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, विधानपरिषदे विरोधी नेते एस. आर. पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे, माजी विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार, निजदचे विधिमंडळ नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वारी, बसवराज होरट्टी, एच. डी. रेवण्णा आदी उपस्थित होते.
विषाणू नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत
कोरोना विषाणू नियंत्रणासाठी आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. अशा तऱहेने सरकारने निर्णय घ्यावेत. सरकारने खेडय़ांमध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही याकरिता ठोस पावले उचलावीत. विदेशातून आलेल्यांची योग्य पद्धतीने आरोग्य तपासणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सरकारकडून मिळणारी माहितीही अस्पष्ट आहे.
– सिद्धरामय्या, विरोधी पक्षनेते
अधिक पैशांचा वापर करा
राज्यात कोरोना विषाणूविरुद्ध लढा उभारण्याची आपल्या सर्वांची आहे. ग्रामीण भागात स्थानिक संघटनांच्या मदतीने पीडीओंमार्फत जनतेच्या आरोग्यासंबंधीचा अहवाल मागविण्यात यावी. रस्ते, सरकारी इमारतींची बांधकामे सहा महिने लांबणीवर टाका. कोरोना नियंत्रणासाठी पैशांचा अधिक वापर करा. इस्पितळांमध्ये अत्याधुनिक व्यवस्था करा.
– कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री









