मनपाचा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्यापूर्वी दिली होती नोटीस : काही रुग्णालयांसमोर पेच
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कचऱयावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने टाळे ठोकले आहेत. मात्र, प्रकल्पाला टाळे ठोकण्यापूर्वी सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी प्रकल्पाकडे कचरा सोपविण्याची सूचना करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.
शहर व उपनगरात खासगी रुग्णालयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय कचऱयाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचऱयाचा साठा वाढत आहे. शहरात निर्माण होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पावर क्षमतेपेक्षा अधिक कचऱयावर प्रक्रिया करण्यात येत असल्याने वैद्यकीय कचऱयावर व्यवस्थित प्रक्रिया होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
प्रकल्पाचा त्रास खासबाग व जुनेबेळगाव परिसरातील रहिवाशांना होत आहे. प्रकल्पातून उडणाऱया भुकटीचे थर नागरिकांच्या घरांवर साचत आहेत. परिणामी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापूर्वी कचरा डेपो बंद करण्याची मागणी करून रहिवाशांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे कचरा डेपोला टाळे ठोकण्यात आले होते. तसेच वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
सदर प्रकल्प स्थलांतर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होती. पण जागा उपलब्ध झाली नसल्याने स्थलांतरासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत देऊनही प्रकल्पाचे स्थलांतर झाले नसल्याने महापालिकेने वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकले आहेत. त्यामुळे वैद्यकीय कचऱयावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे. काही खासगी रुग्णालयांमधील कचरा खासगी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे देण्यात येत आहे. मात्र काही रुग्णालयांसमोर पेच निर्माण झाला आहे. काही रुग्णालयांतील कचरा रस्त्याशेजारी किंवा कचराकुंडीत टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
चाचपणी करण्याची गरज
वैद्यकीय कचरा खासगी तत्त्वावर सुरू असलेल्या वैद्यकीय कचरा प्रकल्पाकडे सोपविण्याची नोटीस सर्व खासगी रुग्णालयांना मनपाच्यावतीने खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्यापूर्वी देण्यात आली होती. सदर नोटीस बजावल्यानंतर वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले आहे. पण खासगी रुग्णालयांमधील कचरा खासगी प्रकल्पाकडे देण्यात येतो का, याची चाचपणी मनपाच्यावतीने करण्यात आली नाही.
महापालिकेचा वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद झाला असल्याने वैद्यकीय कचऱयाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी वैद्यकीय कचरा रस्त्याशेजारी किंवा कुंडीत टाकण्याचा धोका आहे. त्यामुळे मनपाच्यावतीने बजावण्यात आलेल्या नोटिशीची अंमलबजावणी खासगी रुग्णालयांकडून होत आहे का? याची पाहणी करण्याची गरज आहे.









