साटेली-भेडशी /प्रतिनिधी-
प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन सारंग यांची बदली तात्काळ रद्द न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच लखू खरवत यांनी दिला आहे.
साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची हिंगोली येथे प्रशासकीय बदली झाल्याची माहिती मिळताच या बदलीला स्थानिक नागरिक ,लोकप्रतिनिधी यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. डॉ. सारंग यांनी गेली नऊ वर्षे या आरोग्य केंद्रात उत्तम सेवा बजावली आहे. येथील आरोग्य केंद्रात काही आवश्यक सेवांची वानवा असतानाही अशा परिस्थितीत त्यांनी नियमित चांगली सेवा देण्याचे काम केले आहे. डॉ. सारंग हे रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. यामुळे डॉ. सारंग यांची या आरोग्य केंद्राला नितांत गरज आहे त्यामुळे त्यांची झालेली प्रशासकीय बदली तात्काळ रद्द व्हावी अशी मागणी साटेली-भेडशी सरपंच लखु खरवत यांनी केली आहे.येत्या चार दिवसात बदली रद्द झाल्याचे अधिकृत पत्र न आल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री खरवत यांनी दिला आहे.