प्रतिनिधी / सातारा :
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण रुग्णालयालगत उभारण्यात येत असलेल्या सुविधांची म्हणजेच दोन लेक्चर हॉल, लॅबोरेटरी, डिसेक्शन हॉल आणि पहिल्या मजल्यावर लायब्ररी, डेमो रुम, एचओडी रुम्स, इत्यादी कामांची पहाणी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी या महाविद्यालय यंदाची प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु झाली पाहीजे, त्या दृष्टीने सर्वांनीच योगदान द्यावे, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
खा. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातील वैद्यकिय महाविद्यालयाच्या उपलब्ध सुविधांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रमुख उपस्थित होते.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मंजूरी करीता आणि उभारणीकरीता आज पर्यंत अनेक अडथळे आले तरी देखिल अनेकांचे सहकार्य देखिल लाभलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या वैद्यकिय शिक्षण प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य विज्ञान परिषद, राज्यशासन आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या संयुक्त प्रयत्नातुन आता पुढील प्रवेश कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आमचे लागेल ते सहकार्य राहीले आहे आणि यापुढेही राहणार आहे.
कोणत्याही प्रशासकीय कारणास्तव यंदाची प्रवेश प्रक्रीया रखडली गेली तर त्याबाबत संबंधितांना जाब द्यावा लागेल, आता सर्व सोपस्कार पूर्ण झाले असल्याने, आता आम्हाला यंदापासून प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली पाहीजे, असे नमुद करुन उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयाच्या उपयोगी असणाऱ्या विविध सुविधांची पहाणी करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी काका धुमाळ, आबा इंगळे, सचिन नलवडे, सचिन आगाणे, उपअभियंता सार्व.बांधकामचे अहिरे व आंबेकर, यांचेसह वैद्यकिय महाविद्यालयाचे प्राध्यापक, सिव्हील हॉस्पिटलचे अधिकारी,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.









