कोरोनामुळे सल्लागार उपसमितीच्यावतीने घेतला निर्णय
वार्ताहर / किणये
बेळगावसह चंदगड तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थानची दवणी यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्रात बुधवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच प्रशासनामार्फत यात्रांवर निर्बंध घातले आहेत. प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
दि. 25, 26 व 27 अशी तीन दिवस वैजनाथ देवस्थानची दवणी यात्रा आयोजित करण्यात आली होती. दि. 25 रोजीपासून यात्रेला सुरुवात होऊन यात्री शिवपार्वतीचा विवाह सोहळा दि. 26 रोजी भरयात्रा व दि. 27 रोजी महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे आणि प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करीत स्थानिक सल्लागार समितीच्यावतीने दवणी यात्रा रद्द करण्यात आली असून यात्रेच्या या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. जनतेच्या हितासाठी यात्रा रद्द करण्यात आली असून यावर्षी भाविकांनी सहकार्य करावे असे सल्लागार समितीने कळविले आहे. तर यात्रेत खंड पडू नये म्हणून शिवपार्वती विवाह सोहळा व धार्मिक विधी केवळ स्थानिक सल्लागार उपसमिती व मानकऱयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेला येऊ नये तसेच मंदिरही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व भक्तांनी सहकार्य करावे असे सल्लागार उपसमितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.









