नेतान्याहू यांच्या निर्णयामुळे बायडेन नाराज होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलने वेस्ट बँकेच्या (पश्चिम किनाऱयावरील) भागात 800 नव्या घरांच्या निर्मितीची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनासोबत तणाव निर्माण होऊ शकतो. मागील महिन्यात ज्या भागात पॅलेस्टीनी हल्लेखोरांच्या हल्ल्यात एका इस्रायली महिलेचा मृत्यू झाला होता तेथेच यातील 100 घरांची निर्मिती होणार आहे.
या घोषणेमुळे मार्चमध्ये होणाऱया निवडणुकीपूर्वी नेतान्याहू यांच्या पक्षाचे बळ वाढणार आहे. नेतान्याहू यांच्या या घोषणेमुळे जो बायडेन नाराज होऊ शकतात, असे मानले जात आहे. बायडेन यांनी यापूर्वीच वेस्ट बँकेत इस्रायलच्या वसाहतीच्या विस्ताराला विरोध दर्शविला आहे.
1967 च्या युद्धात कब्जा
इस्रायलने 1967 च्या युद्धात पश्चिम किनारा आणि पूर्व जेरूसलेमवर कब्जा केला होता. तर पॅलेस्टीनी लोक यावर नियंत्रण इच्छित आहेत. पश्चिम तटावर फैलावलेल्या वसाहतीत सुमारे 5 लाख इस्रायलींचे वास्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन तसेच शांततेत अडथळा आणणारी ही वसाहत असल्याची पॅलेस्टिनींची भूमिका असून याला व्यापक आंतरराष्ट्रीय समर्थनही प्राप्त आहे.
बायडेन घेणार निर्णय
वेस्ट बँकेतील वसाहतीला भेट देणारे विदेश मंत्री माइक पॉम्पियो हे अमेरिकेचे पहिले नेते ठरले होते. तर पॅलेस्टीनींसाठीची बंद झालेली मदत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बायडेन घेणार आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात दशकभरापासून कुठलीच ठोस शांतता चर्चा झालेली नाही.









