जैतनमाळ येथील प्रकार : तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाई न केल्यास नागरिकांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

प्रतिनिधी /बेळगाव
फौंड्रीमधील वेस्ट सॅन्ड जैतनमाळ येथील शाळेच्या जागेवर टाकली जात आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून हा प्रकार सुरू असून यामुळे शाळेचे विद्यार्थी व आसपासच्या नागरिकांचा जीव धोक्मयात आला आहे. रात्रीच्यावेळी वेस्ट सॅन्ड टाकली जात असून वाऱयामुळे ती उडून शाळा व रहिवासी वसाहतीपर्यंत येत आहे. असे प्रकार करणाऱयावर कारवाई करा, अशी तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
उद्यमबाग, जैतनमाळ, पार्वतीनगर या परिसरातील खुल्या जागांवर रात्रीच्यावेळी वेस्ट सॅन्ड टाकली जात आहे. काही भागात तर याचे ढीगारे साठले आहेत. त्यामुळे चांगल्या असणाऱया जमिनीवर वेस्ट सॅन्ड टाकल्याने ती जमीनही खराब होत आहे. यातच भरीसभर म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील औषधे व इतर कचरादेखील आणून टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरात डंपिंग ग्राऊंडचे चित्र निर्माण झाले आहे. वाऱयासोबत वाळूचे कण इतरत्र पसरत आहेत. ही वाळू धोकादायक असल्यामुळे ती खुल्या जागेवर टाकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या वाळूचा पुनर्वापर करून दुसरे साहित्य तयार केले जाते. मोठय़ा फौंड्री या वाळूचा पुनर्वापर करतात. परंतु काही लहान फौंड्रीचालक शिल्लक राहिलेली वाळू मिळेल त्या जागी टाकत आहेत. असे प्रकार बंद न झाल्यास जैतनमाळ येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
वेस्ट सॅन्ड इतरत्र टाकणे धोक्याचेच
फौंड्री उद्योगात अनेक रसायनांचा वापर करून मोल्ड बनविले जातात. मोल्ड काढल्यानंतर जो वरचा साचा राहतो तो वेस्ट सॅन्डचा असतो. तसेच फौंड्रींमधून मोठय़ा प्रमाणात सॅन्ड बाहेर पडत असते. काळय़ा रंगाची ही सॅन्ड मातीत मिसळली तर पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. पावसाळय़ात वाळूमधील अंश जमिनीमध्ये मिसळले जाऊन बोरवेलद्वारे हेच पाणी प्याल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता असते.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप प्रकार सुरूच
जैतनमाळ परिसरात मागील 3 ते 4 वर्षांपासून फौंड्रीमधील वेस्ट सॅन्ड टाकली जात आहे. यामुळे या परिसरात धोका वाढला आहे. वाऱयाने ही वेस्ट सॅन्ड शाळा व आसपासच्या घरांमध्ये शिरत आहे. नाकावाटे पोटामध्ये जाऊन गंभीर आजार होण्यापूर्वीच खुल्या जागेवर सॅन्ड टाकणाऱयांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. यापूर्वीही आम्ही सर्वच विभागांना पत्र लिहून तक्रारी दिल्या आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप हे प्रकार सुरूच असल्याची खंत गोविंद वेलिंग यांनी व्यक्त केली.
-गोविंद वेलिंग (प्रशासक-ज्ञान प्रबोधन स्कूल)









