चित्रपटसृष्टीत कलागुणांना राजमान्यता आणि लोकमान्यता देणारा शेवटचा मुक्काम म्हणजे ऑस्कर पुरस्कार. ऑस्करसाठी केवळ नामनिर्देशन झाले तरी त्या व्यक्तीसाठी आकाश ठेंगणे. भारताला पहिल्या ऑस्करचा मान मिळवून देणाऱया आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे देश एका स्वतंत्र शैलीच्या प्रतिभावंत, प्रज्ञावंत वेशभूषाकारास मुकला आहे. गांधी चित्रपटासाठी भानू अथय्या यांना ऑस्करचा विशेष सन्मान मिळाला हे खरे, परंतु भारताला पहिला ऑस्कर मिळवून देत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला देखील जगात प्रतिष्ठा मिळवून दिली आणि जगाचे लक्ष भारतीय सिनेमाकडे वेधून घेतले. सिनेमा तंत्रामध्ये कलाकाराच्या अभिनयाला व चित्रपटाच्या आशयाला उठाव मिळण्यासाठी वेशभूषा (कॉश्च्युम डिझाईन) अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. वेशभूषा ही नेहमी हेतुपूर्वक व योजनापूर्वक केली जाते. त्यासाठी तो चित्रपट ऐतिहासिक, पौराणिक की समकालीन हे पहावे लागते. म्हणूनच या ठिकाणी वेशभूषाकाराची कल्पकता, प्रतिभा, ज्ञान व अभ्यास यांचा कस लागतो. भानू अथय्या यांच्या ठायी हे सर्व गुण एकवटल्यामुळे सिनेसृष्टीत त्या दबदबा निर्माण करू शकल्या. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी वेशभूषाकाराच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: अधिराज्य गाजवले. शंभरहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी कॉश्च्युम डिझायनरची भूमिका पार पाडली. काही चित्रपटांच्या नावावर नजर टाकली तरी त्यांच्या कामाची झेप लक्षात येईल. सीआयडी, श्री 420, साहिब, बिबी और गुलाम, गाईड, तिसरी मंझील, आम्रपाली, ब्रम्हचारी, प्यासा, चौदहवी का चाँद, जॉनी मेरा नाम, सत्यम शिवम सुंदरम, कर्ज, एक दुजे के लिए, अग्निपथ, ओम शांती ओम, लगान, स्वदेस अशा एकापेक्षा एक चित्रपटांची यादी देता येईल. प्रतिथयश चित्रपट निर्माते गुरुदत्त, यश चोप्रा, बी. आर चोप्रा, राज कपूर ते अगदी आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत त्यांनी काम केले. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटानंतर त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. दिग्दर्शक रिचर्ड ऍटनबरो यांनी गांधी चित्रपटासाठी भानू अथय्या यांची वेशभूषाकार म्हणून निवड केली. भानू अथय्या यांची क्षमता पाहून अवघ्या 15 मिनिटात त्यांचे नाव निश्चित केले. तो विश्वास भानूनी ऑस्कर पटकावून सार्थ ठरवला. ब्रिटिशांविरुद्ध लढय़ाचे वातावरण, स्वातंत्र्य चळवळीतील नेते, राहणीमानानुसार त्यांचा पेहराव यासाठी त्यांनी अक्षरश: जीव ओतून काम केले. द. आफ्रिकेतील बॅ. एम. के. गांधी ते महात्मा गांधी पर्यंत त्यांचा काळानुरुप बदललेला पेहराव व त्यांच्या सोबतच्या नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या नेत्यांची वेशभूषा. स्वातंत्र्य आंदोलनात स्वदेशी व ग्रामोद्धार यांचा फारच बोलबाला होता. या चळवळीमुळे खादी कपडे हाच संपूर्ण देशाचा पोशाख बनला होता. खादीची गांधी टोपी, नेहरू शर्ट, जाकिट, पायजमा किंवा धोतर असे त्यावेळी भारतातले चित्र होते. विशेष म्हणजे गांधी टोपीवर बारकाईने संशोधन करून ती टोपी त्यांनी बनवून घेतली. गांधी चित्रपटातील हजारो व्यक्तिरेखांच्या वेशभूषेचे आव्हान त्यांनी पेलले आणि त्याचे चीजही झाले. रिचर्ड ऍटनबरो यांचे दमदार दिग्दर्शन, गांधीजींच्या भूमिकेतील बेन किंग्जले, कस्तुरबाच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, रोशन सेठ, अमरीश पुरी, सईद जाफरी, मोहन आगाशे यांच्या कसदार भूमिका व या सर्वांच्या जोडीला भानू अथय्या यांची परिणामाकारक वेशभूषा. यामुळेच प्रेक्षक स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी व समकालीन नेत्यांच्या अस्सल जीवनात गेले. रोहिणी हट्टंगडी यांनी गांधी चित्रपटाविषयी सांगितलेल्या आठवणीवरून भानू यांच्या निरीक्षण शक्तीची झेप समजून येते. दक्षिण आफ्रिकेतून येताना गांधी व गोपाळ कृष्ण गोखले यांची एका पार्टीत भेट होते. सोबत कस्तुरबा होत्या. यावेळी त्यांनी बुट्टीवाली साडी परिधान केली होती. विशेष म्हणजे, या प्रसंगाचा एकमेव फोटो त्यांना उपलब्ध झाला. चित्रपटातील कस्तुरबाच्या अंगावर हुबेहूब तशीच बुट्टीवाली साडी असायला हवी यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. त्यांनी उलटय़ा एम अक्षरासारखी बुट्टीवाली एम्ब्रॉयडरी साडी तयार करून घेतली. कामाप्रती असलेली सत्यता आणि निष्ठेशिवाय हे शक्य नसते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या भानू अथय्या या मूळच्या कोल्हापूरच्या. भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. छत्रपती घराण्याचे पौरोहित्य परंपरेने त्यांच्या घराण्याकडे होते. दाक्षिणात्य वेशभूषाकार सत्येंद्र अथय्या यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या भानू अथय्या झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. पौरोहित्याबरोबर चित्रकलेतही त्यांच्या वडिलांचा हातखंडा होता. त्यांच्याकडूनच त्यांना चित्रकलेचा वारसा मिळाला. आई शांताबाई यांनी त्यांच्यातील चित्रकलेची आवड हेरून मुलीला शिकवण्यासाठी चित्रकलेचे खास शिक्षक नेमले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला. करिअरच्या सुरुवातीला इंग्रजी मासिकासाठी फॅशन इलेस्ट्रेशन देत असत. त्यांची रेखाचित्रे फारच गाजली. फॅशनच्या दुनियेत त्यांचे नाव झाले. त्यांच्या फॅशन इलेस्ट्रेशनकडे अभिनेत्री नर्गिस यांचे लक्ष गेले. त्यांच्यातील प्रतिभाशक्तीची ताकद ओळखून नर्गिस यांनी श्री 420 चित्रपटासाठी राज कपूर यांच्याकडे भानू अथय्या यांच्यासाठी आग्रह धरला. या चित्रपटासाठी त्यांना कॉश्च्युम डिझाईनचे काम मिळाले. मुडमुड के ना देख मुडमुड के या लोकप्रिय गाण्यासाठी त्यांनी नादिरासाठी विशिष्ट असा ग्रेसफुल गाऊन दिला. मेरा जुता है जपानी या गाण्यातील राज कपूरचे कॉश्च्युम प्रेक्षकांचे ‘दिल’ जिंकून गेले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. फॅशन डिझाईन क्षेत्रापासून दूर होत त्या चित्रपटसृष्टीत रुळल्या. सिनेमातून वेशभूषेची दुनियाच बदलून टाकली. 70-80 च्या वयातही त्यांनी लेकिन आणि ऑस्कर नामनिर्देशित लगान हे शेवटचे दोन चित्रपट केले. त्यांच्या निधनामुळे वेशभूषेचा एक किमयागार काळाच्या पडद्याआड गेला.
Previous Articleलेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी
Next Article कर्नाटकात शुक्रवारी कोरोनाचे ७ हजारहून अधिक रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








