आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्र्यांना खणखणीत उत्तर
पणजी / प्रतिनिधी –
दिनांक 1 नोव्हेंबर रोजी चांदोर येथे झालेल्या निषेध फेरी आणि जाहीर सभेच्या विरोधात सरकारकडून प्राथमिक माहिती अहवाल तक्रार (एफआयआर ) दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीचा तीव्र निषेध आम आदमी पक्षाने केला असून सरकारवर तिखट शब्दांमध्ये पलटवार केला आहे.
या विषयी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदेश तेलेकर यांनी तीव्र शब्दात सरकारवर हल्ला चढविताना म्हटले, “वेळ पडली तर स्वतःवर 100 एफआयआर झेलण्यास तयार आहोत पण गोव्याचे रूपांतर कोळसा खाणीत होण्यापासून आणि ते रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणापासून होण्यापासून कधीही रोखू. हवे तर तुरुंगात टाका, पण आम्ही झुकणार नाही, हे लक्षात घ्या.” त्यांनी पुढे म्हटले आहे की नोंद करून घेण्यात आलेली एफआयआर आंदोलकांना येत्या 8 नोव्हेंबर रोजी होणाऱया आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी आहे. नोंद करण्यात आलेली एफआयआर हेच सूचित करते या चळवळीला दिसत असलेला वाढता प्रतिसाद बघून सरकार घाबरलेले आहे. संदेश यांनी सूचित करताना एक मुद्दा मांडला की अशाच प्रकारचा निषेध कार्यक्रम 27 ऑक्टोबरच्या रात्री साओ जुझे डी एरिअल येथे झाला पण त्यावेळी कुठलीही एफआयआर नोंद झाली नाही. चांदर येथे मोठय़ा प्रमाणात लोक जमलेले पाहून सरकारने एफआयआर नोंद केली असे संदेश म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे असे हुकूमशाही वागणे एक दिवस त्यांच्या अंगलट येईल. गोमंतकीय आवाज चिरडण्याचा कुठलाही प्रयत्न हा तोच आवाज जास्त बुलंद व मजबूत बनविणारा ठरेल, असे संदेश पुढे म्हणाले.
“आम्ही गोवेकर आमच्या भूमीवर प्रेम करतो आणि त्यासाठी तिचे रक्षण करण्यासाठी आमच्या जीवनाची आहुती द्यायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. मुख्यमंत्र्यांचे अलोकशाही पद्धतीचे वागणे हेच दर्शविते की ही प्रचंड भीती त्यांना भेडसावते आहे कारण त्यांना माहित आहे की गोव्याच्या लोकांनी त्यांना झिडकारले आहे आणि त्यांचे “सिंहासन ” आता संकटात सापडले आहे. सरकारला भीती वाटते आहे की दवर्ली येथे 8 नोव्हेंबर रोजी होणाऱया निषेध सभेमध्ये जास्त प्रचंड मोठी गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे लोकांना घाबरविण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मला मुख्यमंत्र्यांना हे सांगायचे आहे की आता गोवेकरांसाठी काम करायला सुरुवात करा आणि अदानीच्या हातचे बाहुले बनून काम करणे बंद करा कारण गोवा हे गोवेकरांचे आहे, अदानींचे नव्हे ” असे संदेश म्हणाले.
संदेश पुढे म्हणाले की सरकारला वाटत असेल की एफआयआर नोंद होईल या भीतीने लोक दवरली येथील बैठकीला येणार नाहीत पण मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटेल जेव्हा पूर्वीपेक्षा जास्त लोक आणखीन प्रचंड मोठय़ा संख्येने येतील आणि सरकारने अवलंबिलेल्या दादागिरीच्या विरोधात आपला राग उघडपणे व्यक्त करतील, असे त्यांनी सांगितले.
तेलेकर पुढे म्हणाले, “भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही जी ठाम भूमिका आम्ही घेतली होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे कारण दिगंबर कामत किंवा इतर माजी मंत्री किंवा आमदार यांच्यासह कुठल्याही काँग्रेस नेत्यांविरुद्ध एफआयआर मध्ये उल्लेख केलेला नाही.”
तेलेकर पुढे असेही म्हणाले गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांचे तसेच पक्ष सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांचे नाव त्याच्यामध्ये नसणे हेही समजू शकते आणि कारण प्रकल्पाला मान्यता आणि हिरवा कंदील दाखविला गेला होता त्यावेळी हीच माणसे सरकारचा भाग होती.
आम आदमी पक्षाने आता सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना म्हटले आहे की त्यांनी लोकांना धमकावण्यासाठी हवे ते डावपेच वापरावेत पण जनता प्रतिकार करेल आणि येत्या निवडणुकांमध्ये मुहतोड जवाब देणारच असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.









