नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांनी गुरुवारी दुपारी केला पाहणी दौरा
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी, महापालिका आणि बुडाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विकास कामाची पाहणी शुक्रवार दि. 8 रोजी करण्यात येणार होती. मात्र नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. हे गुरुवारी दुपारीच शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. प्रलंबित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिका अधिकाऱयांना केली.
नगरविकास मंत्री शहराच्या पाहणी दौऱयावर आले आहेत. दौऱयाच्या वेळेत बदल झाल्याने निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच शहरात दाखल होऊन विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी नेहरूनगर येथील व्यापारी संकुलाच्या कामाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच सदर व्यापारी संकुलाचे काम तातडीने पूर्ण करून पावसाळय़ापूर्वी भाडेतत्त्वावर द्यावे, अशी सूचना मनपा अधिकाऱयांना केली. आझमनगर येथे पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या ठिकाणी 3 इमारती बांधून स्वच्छता कामगारांना देण्यात येणार आहेत. इमारत बांधकामांची पाहणी नगरविकासमंत्र्यांनी केली. स्वच्छता कामगारांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 3 इमारती उभारण्यात येत आहेत. दुसऱया टप्प्यात आणखी काही इमारती बांधून स्वच्छता कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती नगरविकास मंत्र्यांनी पत्रकारांना दिली.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण करा
शहरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच हलगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची माहिती घेण्यासाठी नगरविकास मंत्र्यांनी हलगा येथे भेट दिली. तसेच सांडपाणी प्रकल्प राबविण्यास विलंब का झाला असा प्रश्न पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना विचारला. प्रकल्प निर्माण करण्यास शेतकऱयांचा विरोध असल्याने तसेच न्यायालयीन वादामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाची उभारणी करण्यास विलंब होत असल्याचे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी व महापालिका आयुक्तांनी सांगितले. सदर काम लवकर पूर्ण करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी सूचना केली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मध्यवर्ती शहर बसस्थानकाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाची पाहणी देखील नगरविकास मंत्र्यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव शहरात अनेक कामे सुरू आहेत. मात्र नागरिकांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा आदेश स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना बजावला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांची पाहणी करून शहरातील तीन उद्यानांची पाहणी केली. तसेच विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱयांना विविध सूचना केल्या. शहरात 24 तास पाणी योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याने या कामाबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच., स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर, पाणीपुरवठा मंडळाचे आणि पायाभूत सुविधा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.









