प्रतिनिधी/ मंडणगड
तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी शनिवारी मृतावस्थेतील कासव सापडल्याने पर्यावरणप्रेमीची चिंता वाढली आहे.
वेळास येथे एक तपाहून अधिक काळ सुरु असलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेमुळे जगाच्या नकाशावर कासवांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱया वेळास समुद्र किनाऱयावरच कासव मृतावस्थेत आढळल्याने ते कशामुळे मृत झाले याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात वेळास येथील कासव मित्र विरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे कासव खोल समुद्रात मृत झाले असावे व ते मृतावस्थेत लाटांच्या प्रवाहाबरोबर किनाऱयावर फुगलेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील वनरक्षकांनी ही बाब स्थानिक वनविभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पंचनामा करुन मृत कासव समुद्रकिनारीच वाळूत खड्डा काढून पुरण्यात आले आहे.
वनविभागाकडून याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पस्तीस ते चाळीस वर्षे वय असलेले नर जातीचे हे कासव वेळास समुद्रकिनाऱयाला सापडले असून त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.









