चिखलीत वनविभागातर्फे उपचार सुरू
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील वेळणेश्वरच्या प्रिव्हीलेज रिसॉर्टलगत जखमी अवस्थेत सापडलेल्या गव्यारेडय़ावर गुहागर परिमंडळ वनाधिकाऱयांनी चिखली येथे उपचार सुरू केले आहेत. वेळणेश्वर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या गव्याला जीवदान मिळाले आहे.
तालुक्यात वेळणेश्वर, पालशेत, वरवेली, तळवली, वेळंब आदी भागात मोठय़ा प्रमाणात गवे दिसून येतात. गुरूवारी सकाळी वेळणेश्वर प्रिव्हीलेज रिसॉर्टजवळ कातळावर गुराख्यांना जखमी अवस्थेत एक गवा दिसला. जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर व वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी तेथे पाहणी केली. याची माहिती वनपाल संतोष परशेटे यांना देण्यात आली. ते वनरक्षक रामदास खोत यांना घेऊन घटनास्थळी आले. गव्याला उठता येत नसल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने गव्याला वाहनातून चिखली येथे आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निमूणकर यांनी गव्यावर उपचार सुरू केले आहेत.
उतारावरून खाली कोसळून जखमी?
हा गवा तीन वर्षाचा आहे. जंगलातील उतारावरून तो खाली कोसळून जखमी झाला असून त्याच्या पायाला मार लागल्याचा अंदाज वनपाल परशेटे यांनी व्यक्त केला. गव्याच्या अंगावर इतर कोणत्याही जखमा नाहीत. या गव्यावर उपचार करून तो पूर्ण बरा झाल्यावर त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येईल, अशी माहिती परशेटे यांनी दिली.









