वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू वेन रूनी याचा मुलगा केई याला इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील आघाडीचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने करारबद्ध केले आहे.
35 वषीय रूनीने आपली पत्नी कॉलीन तसेच 11 वषीय मुलगा केई समवेत असलेले छायाचित्र इन्स्टागॅमवर प्रसिद्ध केले आहे. मँचेस्टर युनायटेड संघाने केईबरोबर केलेल्या कराराचा आपल्याला अभिमान वाटतो. आता या क्लबकडून केई खडतर परिश्रम करेल, असा विश्वास वेन रूनीने व्यक्त केला आहे. वेन रूनीने 2004 साली एव्हर्टन क्लबला निरोप दिल्यानंतर मँचेस्टर युनायटेड संघात दाखल झाला होता. मँचेस्टर युनायटेड संघाकडून त्याने तेरा वर्षांच्या कालावधीत 559 सामन्यात 253 गोल नोंदविले आहेत. इंग्लंडतर्फे फुटबॉल क्षेत्रात सर्वाधिक गोल करण्याचा रूनीचा विक्रम अद्याप अबाधित आहे.









