महापौरपद सामान्यांसाठी खुले, उपमहापौरपद सामान्य महिलांकरिता
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुका झाल्याने आता महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. महापौर-उपमहापौर आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र, नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे राजपत्रात नोंद झाल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणूक घेता येणार आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना राज्याच्या राजपत्राची प्रतीक्षा आहे.
घिसाडघाईने महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली. अवघ्या 25 दिवसांत महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, मतदानावेळी व्हीक्हीपॅटचा वापर झाला नसल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी आटापिटा सुरू आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या. महापालिकेत एकूण 58 नगरसेवक असून बहुमतासाठी 33 नगरसेवकांची गरज आहे. निवडणुकीत भाजपने 58 जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने 49 जणांना उमेदवारी दिली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने 23 उमेदवारांची अधिकृत म्हणून घोषणा केली होती.
महापालिका निवडणुकीचा निकाल दि. 6 सप्टेंबर रोजी लागला. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाला महापालिकेत बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळही भाजपकडे आहे. या निवडणुकीत भाजपचे 35 नगरसेवक निवडून आले असून एका माजी नगरसेवकाने अपक्ष म्हणून पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सदर माजी नगरसेवकाची पत्नी निवडणुकीत विजयी झाली आहे. माजी नगरसेवक भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्यांचे मतदेखील भाजपच्या पारडय़ात पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे नगरसेवकांचे संख्याबळ वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. महापालिकेत बहुमत असल्याने आता महापौर-उपमहापौर निवडणुकीचे वेध लागले आहेत.
महापौरपद सामान्यांसाठी खुले आहे. उपमहापौरपद सामान्य महिलांकरिता राखीव आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्य महापालिकांसोबत बेळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे पुढील कालावधीसाठी या आरक्षणानुसारच महापौर-उपमहापौर निवड करावी लागणार आहे. आरक्षण यापूर्वीच जाहीर झाल्याने महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यासाठी आटापिटा सुरू आहे. पण नगरसेवकांची नोंद राज्याच्या राजपत्रात होणे आवश्यक आहे. राजपत्रात नगरसेवक म्हणून नेंद झाल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी मतदान प्रक्रियेत सहभागी होता येते. त्यामुळे राजपत्रात नगरसेवक म्हणून नोंद होण्याची प्रतीक्षा नगरसेवकांना आहे.









