नवरात्रौत्सवात होणार विविध रुपामंधील देवीची प्रतिष्ठापना : बहुसंख्य मंडळांत चार फुटांपर्यंतच्याच दुर्गामूर्ती दिसणार
प्रतिनिधी/ कोल्हापूर
अवघ्या चारच दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाचे शहरवासियांना वेध लागले आहेत. शासनाने अनलाŸक केल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे धोत्री गल्ली, गंगावेश, दत्तगल्ली (महाद्वार रोड परिसर), शाहूपुरी, बापट कॅम्प येथील कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गामूर्ती बना†वण्याच्या कामावर अखेरचा हात फिरवला जात आहे. मूर्तीकार गणेशमूर्तीप्रमाणे ऑर्डरीनूसारच दुर्गामूर्ती साकारल्या आहेत. यंदाच्या नवरात्रौत्सवात शहर, उपनगरासह आजबाजूच्या गावांमध्ये आठशेहून अधिक मंडळांकडून दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोरोनाचे बंधन असले तरी मंडळांनी शासनाच्या नियमांप्रमाणे रास दांडिया व गरबा आयोजनाची तयारी सुरु केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गामूर्ती बनविण्याचे काम जोमाने सुरु आहे. अनेक मंडळे दुर्गामूर्तीचे बुकिंग करण्यासाठी कुंभार गल्ल्यांमध्ये दाखल होत आहेत. मंडळांना ज्या रुपामध्ये दुर्गामूर्ती हवी त्या रुपात मूर्ती बनवून देण्यावर मूर्तीकारांनी भर दिला असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मयुरासनारूढ, अष्टभुजा, महिषा सुरमर्दिनी, सिंहासनारूढ, अंबाबाई, तुळजा भवानी, रेणुकादेवी, खडी, बैठी, पंखपुजा, सिंहवाहिनी, महाकाली, कमळात विराजमान आदी रुपातील दुर्गामूर्तींचा समावेश आहे. काही मूर्तीकारांनी पर्यावरण संवर्धन आणि पाणी प्रदुषणाचा मुद्दा डेळ्यासमोर ठेवून फ्लास्टर आणि शाडू मिक्स करुन दुर्गामूर्ती बनवल्या आहेत. शिवाय काही मंडळांनी बंगाल पद्धतीच्या दुर्गामूर्तींची बनवून देण्याच्या ऑर्डरी मूर्तीकारांना दिली आहेत. नवरात्रौत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने मोठे परिश्रम घेऊन बनवलेल्या दुर्गामूर्ती आकर्षक रंगांनी रंगवण्याच्या कामात मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंबच व्यस्त झाले आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही सर्वात जास्त दुर्गामूर्तींच्या ऑर्डरी मंडळांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतील मूर्तीकारांना दिल्या आहेत. त्यामुळे मूर्तीकार रात्री उशिरापर्यंत जागून दुर्गामूर्तीचे काम पुर्णत्वला नेण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
म्हणून दुर्गामूर्तींची संख्या वाढली…
शहर व परिसरातील गावांमध्ये गणेशोत्सवाबरोबरच नवरात्रौत्सवही साजरा करणाऱया मंडळांची संख्या मोठी आहे. शिवाय फक्त नवरात्रौत्सवच साजरा करणाऱया मंडळांची संख्या वर्षागणिक वाढतच चालली आहे. गेल्या 10 वर्षांपासून शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये दुर्गामूर्तींची संख्याही वाढत चालली आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवासाठीही आठशेहून अधिक मंडळांनी दुर्गामूर्तींच्या ऑर्डर्स शहरातील मूर्तीकारांना दिल्या आहेत. वैशिष्ठय म्हणजे शासनाने ऊंचीबाबत कोणतेही निर्देश दिलेले नसताना बहुसंख्य मंडळांनी दोन ते चार फुटांपर्यंतच्या दुर्गामूर्ती बनवून घेण्याला प्राधान्य दिले असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे.