क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या पर्वातील समारोप सोहळा आज धुळेर येथील जीएफएच्या स्टेडियमवर होणार आहे. गेले एक महिनाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांचे रोमहर्षक लीग सामने झाले.
शिरवडे स्पोर्ट्स क्लब, गोवा युनायटेड स्पोर्ट्स क्लब, कॉम्पेशन फुटबॉल क्लब, एफसी गोवा आणि फुटबॉल क्लब वायएफएस या संघांनी आकर्षक फुटबॉल खेळाचे दर्शन घडविले. आज सायंकाळी धुळेर मैदानावर होणाऱया सामन्यानंतर विजेता संघ आणि बक्षीसप्राप्त खेळाडूंना वेदांता स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अनन्य अगरवाल यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी गोवा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष लॅविनियो रिबेलो उपस्थित असतील.
सध्या स्पर्धेतील दोन लीग सामने खेळायचे शिल्लक आहेत. शिरवडे स्पोर्ट्स क्लब सध्या लीगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आज सकाळी 8.15 वाजता नावेलीतील रोझरी मैदानावर एफसी गोवा आणि गोवा युनायटेड तर धुळेर मैदानावर कॉम्पेशन एफसी आणि अजिंक्यपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या शिरवडे स्पोर्ट्स क्लब यांच्यात लढती होतील. मागील चार वर्षे वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असून यात 350हून अधिक महिला फुटबॉलपटूंनी आपला सहभाग दर्शविला आहे. यंदाच्या स्पर्धेत राज्यभरातून 100 हून अधिक महिला फुटबॉलपटूंनी भाग घेतला.
वेदांता महिला लीगची लोकप्रियता व यश पाहून मला फार आनंद होत असल्याची प्रतिक्रिया वेदांता स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अनन्य अगरवाल यांनी दिली. वेदांता स्पोर्ट्समध्ये आम्ही प्रशिक्षणाद्वारे खेळाच्या विकासावर विश्वास ठेवतो. वेदांता महिला लीगसारख्या उपक्रमातून महिला फुटबॉलच्या विकासात भर पडणार आहे, असे अगरवाल म्हणाले. वेदांत महिला लीग फुटबॉल स्पर्धा हा राज्यातील महिला फुटबॉलपटूंच्या उत्कर्षासाठी एक महत्वाचा उपक्रम आहे. ही लीग फुटबॉलच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महिला फुटबॉलपटूंना मदत करीत आहे. या लीगमध्ये खेळलेली करिश्मा शिरवईकर भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भविष्यात आणखी खेळाडू यशस्वी व्हावेत अशी मी आशा करतो, असे गोवा फुटबॉल विकास मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर म्हणाले.








