वृत्तसंस्था/ चेन्नई
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू हार्दिक पंडय़ा खांद्याच्या वेदनेमुळे मागील तीन सामन्यात गोलंदाजी करू शकलेला नाही, अशी माहिती मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धनेने दिली.
इंग्लंड विरूद्ध शेवटच्या वनडे सामन्यासाठी हार्दिकला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. हार्दिकला या दुखापतीमुळे बऱयाच मालिकांना यापूर्वी मुकावे लागले होते. अद्याप त्याला काही वेदना जाणवत आहेत. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून धोका पत्करला गेला नाही. पुढील काही आठवडय़ानंतर हार्दिक पुन्हा पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करू शकेल असा विश्वास प्रशिक्षक जयवर्धनेने व्यक्त केला आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या झालेल्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पंडय़ाने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडविताना अचूक फेकीवर सनरायजर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद याला धावचीत केल्याने मुंबई इंडियन्सने हा सामना 13 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्स संघातील फिरकी गोलंदाज राहुल चहरने दर्जेदार गोलंदाजी करत गेल्या दोन सामन्यात 7 गडी बाद केले आहेत.









