आज स्वच्छतेच्या कामांची समस्या गंभीर होणार
प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पालिका कर्मचाऱयांचा संप काल मंगळवारी दुसऱया दिवशीही चालूच राहिला. या कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न रात्री उशिरापर्यंत सुटला नव्हता. त्यामुळे आज तिसऱया दिवशीही संप कायम राहण्याची शक्यता असून वास्को शहर परीसरात आजपासून कचरा विल्हेवाटीची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्याचे वेतन, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तसेच इतर भत्ते देण्यात आलेले नसल्याने या कामगारांनी सोमवारपासून संप पुकारलेला आहे. वेतनाचा प्रश्न पालिकेच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे वारंवार निर्माण होत असून पालिका कामगारांना वारंवार काम बंद ठेवून वेतनाची मागणी करावी लागत आहे. मागे काही वेळा असेच काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पहिल्याच दिवशी कामगारांच्या वेतनाच्या समस्येवर तोडगा काढण्यास पालिका प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे प्रश्न आजच्या सारखा गंभीर बनला नव्हता. काल मंगळवारी दुसऱया दिवशीही कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटला नव्हता. पालिका कामगार मंगळवारी दिवसभर पालिका इमारतीसमोर जमाव करून होते. जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत कामे हाती घेणार नसल्याचे या कामगारांनी म्हटले आहे.
मंगळवारी सकाळी अखिल गोवा पालिका कामगार संघटनेचे सरचिटणीस आनंद शिरोडकर यांनी संपावरील मुरगाव पालिका कामगारांची भेट घेतली व त्यांच्याशी समस्येवर चर्चा केली. त्यानंतर शिरोडकर यांनी मुरगाव पालिकेवर प्रशासक म्हणून नव्यानेच रूजू झालेल्या प्रशासकीय अधिकारी राजू गावस यांना इतर कामगारांसह भेटून त्यांच्याशी चर्चा केली. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आठ दिवसांचा वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, कामगारांनी आठ दिवस थांबण्यास नकार दिला. वेतनासह इतर मागण्यांवरही त्वरीत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तोपर्यंत कामावर रूजू होण्यास कामगारांनी नकार दिला. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान यांनी संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्येवर चर्चा केली तसेच त्यांना पाठींबा व्यक्त केला.
वेतनाच्या मागणीसाठी कामगार संपावर असल्याने वास्को शहर व परीसरात सफाईची कामे अडलेली असून ठिकठिकाणी कचऱयाचा पसारा वाढू लागलेला आहे. दुर्गंधीमध्येही वाढ होऊ लागलेली आहे. आज तिसऱया दिवशीही संप चालूच राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होणार आहे. ओल्या कचऱयामुळे हॉटेल व्यवसायांचीही चिंता वाढलेली आहे.









