प्रतिनिधी / नागठाणे :
अपशिंगे मंडलाअंतर्गत येत असलेल्या वेणेगाव (ता.सातारा) येथील तलाठी गेल्या १५ ते २० दिवसांपासून गावात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन असलेली कामे ठप्प झाली आहेत. कोणाची वारस नोंद तर कोणाची सातबारा दुरुस्ती अशी सर्वच कामे रेंगाळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. त्यामुळे ‘गेला तलाठी कोणीकडे?’ अशी विचारणा या भागातील ग्रामस्थांमधून होत आहे.
उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता, त्यातच कोरोनाचे संकट या सगळ्यांशी तोंड देत कसा बसा शेतकरी घाम पुसत तलाठी कार्यालयाकडे येतो तर कार्यालयाला टाळा बघून तलाठी नसल्याने ससेहोलपट झाल्याचे तोंडात पुटपुटत घराची वाट धरीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा विकास सेवा सोसायटी, कृषिखात्याच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना अथवा उसाच्या नोंदी असोत या सगळ्याला तलाठ्याच्या सहीशिक्का असलेला सातबारा गरजेचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सज्यातील तलाठीच इकडे फिरकत नाहीत.
जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गाव आपत्ती समिती गठीत केली असून, या समितीचे सहअध्यक्ष तलाठी असल्याने कोपर्डे, सायळी, तुकाईवाडी, वेणेगाव, जावळवाडी या गावात आपत्ती समितीला प्रशासकीय निर्णय घेतानाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. सातारा तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य मेटाकुटीला आलेल्या चारीही गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.
ऑक्सिजन प्लांट निर्मितीवर नेमणूक
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता कोपर्डे-वेणेगाव सजातील तलाठ्यांची नेमणूक मागील काही दिवसापासून सातारा एम. आय. डी. सी. मधील ऑक्सिजन प्लांटच्या निर्मितीवर केली असल्याचे समजते. महसूल विभागाने वेणेगाव सज्यातील तलाठ्यांना एम.आय.डी. सी.येथे नेमणूक देत असतानाच त्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने तसे न करता तलाठ्यांची साताऱ्यात ड्युटी लावली व वेणेगाव सजा मात्र वाऱ्यावर सोडला. याचा नाहक त्रास येथील शेतकरी बांधवांना होत आहे.









