नवी दिल्ली
लडाखमध्ये झालेल्या चिनी सैनिकांविरुद्धच्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्याचाच एक भाग म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे धोरण अवलंबले जात आहे. भारताच्या वेटलिफ्टिंग फेडरेशननेही चीनकडून आलेली उपकरणे खराब असल्याचे कारण दाखवत त्यांचा वापर करणे थांबवले असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे
गेल्या वर्षी आयडब्ल्यूएलएफने चार वेटलिफ्टिंग सेट्सची ऑर्डर ‘झेडकेसी’ या चिनी कंपनीला दिली होती. त्यात बारबेल्स, वेट प्लेट्सचा समावेश होता. त्यांच्याकडून आलेले हे साहित्य सदोष असल्याने त्याचा कोणीही वापर करीत नाही. त्यामुळे आम्ही आता चीनमध्ये तयार झालेल्या उपकरणांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे फेडरेशनचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी सांगितले. फेडरेशनचा हा निर्णय त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) लेखी पत्राद्वारे कळविले असल्याचेही सांगितले.
‘यापुढे चिनी उपकरणांचा आम्ही वापर करणार नसून भारतीय कंपन्यांनी तयार केलेली किंवा अन्य देशांतील कंपनींची उपकरणे वापरणार आहोत,’ असे या पत्रात लिहिल्याचे यादव यांनी सांगितले. लिफ्टर्सनी पुन्हा ट्रेनिंग सुरू केल्यावर चीनकडून आलेल्या उपकरणातील प्लेट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे लक्षात आले. अशा खराब झालेल्या प्लेट्स आम्ही वापरणार नाही,’ असे राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले. शिबिरातील सर्व वेटलिफ्टर्सच्या भावना चिनविरोधी बनल्या असून त्यांनी टिकटॉक ऍप वापरणे बंद केले आहे. ऑनलाईनवरून एखादी वस्तू मागवताना ते चायनीज नसल्याची आधी खात्री करून मगच ऑर्डर देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ही उपकरणे चीनकडूनच का आयात केली, असे विचारता शर्मा म्हणाले की, चीनमध्ये तयार झालेली उपकरणेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये वापरली जाणार आहेत. त्याचा सराव व्हावा यासाठी ती त्यांच्याकडून मागवण्याशिवाय आमच्याकडे अन्य पर्याय नव्हता. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर ट्रेनिंगला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर आम्ही त्यांचा अजिबात वापर केलेला नाही. चीनकडून पहिल्यांदाच सदर उपकरणे मागविण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या स्वीडनमधून आणलेल्या साहित्याचा वापर वेटलिफ्टर्स करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.









