प्रतिनिधी / वेंगुर्ले:
राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे महाराष्ट्रभर 1 लाख 5 हजार 592 मोबाईल परत करण्याचे आंदोलन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी वेंगुर्ले तालुक्यात मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी प्रकल्पाधिकारी श्रमिष्ठा सामंत यांच्याकडे 150 पैकी 146 मोबाईल परत केले. चार मोबाईल मागावून परत करण्यात येणार आहेत.
यावेळी कमलताई परुळेकर म्हणाल्या, 17 सालात खरेदी केलेला हा मोबाईल दोन वर्षे गोडावूनमध्ये राहिल्यानंतर मार्च 19 ला हातात आला. पॅनासॉनिक कंपनीचा हा मोबाईल 2 जीबीचा असल्याने लाभार्थीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, कुपोषणापासून आहारापर्यंत सर्व गोष्ठी यात सेव कराव्या लागतात. त्यामुळे हा मोबाईल हॅग होतो. पोषण ट्रकर नावाचे चांगले ऍप शासनाने दिले. मात्र, काही सरकारी मोबाईलमध्ये ते डाऊनलोड होत नाही. त्यामुळे खासगी मोबाईल वापरण्याची सक्ती केली जाते. 599 तिमाही रिचार्ज पैसे जरी मिळाले, तरी न चालणाऱया मोबाईलवर ते भरावे लागतात. मात्र, खासगी मोबाईलचे पैसे कोण भरणार? तसेच पोषण ट्रकर इंग्रजीत आहे. इंग्रजी न जाणणाऱया सेविका आहेत. त्यांची अडचण होते. काही दुरुस्ती करुन मागितल्यावर प्रश्नावली मराठीत मात्र, उत्तरे इंग्रजीत. त्यामुळे हे ट्रकर मराठीतून मिळावे ही मागणी अध्यक्ष, सचिव, आयुक्तांचे लक्ष वेधले आहेत. अद्याप कार्यवाही झाली नाही म्हणून हे मोबाईल आम्ही परत केल्याचे कमलताई परुळेकर यांनी सांगितले.
यावेळी माधवी ठाकुर, मयुरी राणे, कविता बुगडे, कांचन आरोलकर, मनीषा साळगांवकर, संध्या कोनकर आदी बिट प्रमुख उपस्थित होत्या.









