अत्यावश्यक साहित्य नसल्याने रुग्णांना परवड
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 40 कोरोना रुग्ण आहेत. या सेंटरमधील खोल्यांची स्वच्छता, बंद पडलेले फॅन, ऑक्सिमीटरची कमतरतेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी अधिकारी पाहणीसाठी येतात मात्र, सदर गैरसोईंकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वेंगुर्ले शहरातील कोविड केअर सेंटरमधील हे भयाण वास्तव्य एका रुग्णाने चक्क खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडत वैद्यकीय सेवेच्या दुरावस्थेमुळे रुग्णांचा मृत्यू जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच या सेंटरकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
सर्व रुग्णांसाठी एकच ऑक्सिमीटर
वेंगुर्ल्यात शासनाने गतवर्षीपासून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमधील खोल्यांमध्ये डस्टबिन, झाडूसुद्धा नाही. बाथरूम अस्वच्छ असून खोल्यांमध्ये धुळीचे साम्राज्य असते. काही फॅन बंद आहेत. रविवारपासून कचरा उचललेला नाही. रुग्णांना पिण्याची योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. वृद्ध रुग्णांना पहिल्या मजल्यावरून खाली तपासणीसाठी बोलावले जाते. सर्व रुग्णांसाठी फक्त एक ऑक्सिमीटर उपलब्ध आहे. 25 लिटर पाण्याच्या बाटल्या रुग्णांकडूनच तळ मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत आणल्या जातात. ऑक्सिमीटरची तपासणी करण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता केली जात नाही.
आरोग्य यंत्रणेकडून लक्ष द्यावे!
या सेंटरमध्ये प्रत्येक रुमची व बाथरुमची स्वच्छता, प्रत्येक डॉक्टरांनी रुग्णांच्या तपासणीसाठी प्रत्येक बेडजवळ जाण्याची अपेक्षा आहे. अधिक ऑक्सिमीटर पुरवावेत. मास्कचा पुरेसा साठा सेंटरवर ठेवला पाहिजे.
दात्यांना साहित्य पुरविण्याची गरज
वेंगुर्ले शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिमीटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, छोटे टेबल्स, झाडू व डस्टबीन आदी वस्तुची कमतरता दिसून येत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी, मंडळांनी तसेच दानशूर व्यक्तींनी ते पुरवावे जेणेकरुन कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याच माणसांना चांगली सेवा मिळून ते लवकर बरे होतील.









