कोसलनरेश नग्नाजिताचा पण ऐकून भगवान ताडकन उठले. त्यांनी पितांबराचा कासोटा खोचला. कमरेला शेला घट्ट बांधला. केसांना गाठ मारली. गळय़ातील माळा वस्त्रात खोचल्या आणि त्या मत्त बैलांशी झुंजण्यास ते सज्ज जाहले.
सभागारिं वर्तली कथा । अंतःपुरिं हे ऐकोनि वार्ता ।
नोवरीसहित नृपाच्या कांता । गवाक्षपथें विलोकिती ।
सूक्ष्म रंध्रीं जालांतरिं । सादर पाहती नृपाच्या नारी ।
तंव राजाज्ञेच्या संकेतसूत्रीं । वृषभ किंकरिं चेतविले ।
वृषभशाळेचें कपाट मुक्त । करूनि धुडाविले उन्मत्त ।
बाहेरी लोटले अकस्मात । जेंवि कृतान्त प्रळयान्तीं ।
कौतुक पहावया नागरजनीं । सभा घनवटली उच्चस्थानीं ।
भवतीं कपाटें पिहित करूनी । वृषभ प्राङ्गणीं शोभविले ।
निर्बीज अग्नियंत्राचे कडके । पटह दुंदुभि वाद्यें अनेकें।
वीर गर्जना करिती मुखें । सामान्य लोकें संत्रस्त ।
व्याघ्राजिनें वंशयष्टि । लंबाळ बांधोनि वृषभा दृष्टि ।
दावितां बावरे जाले हट्टी । महाफुंफाटीं उठावती ।
मही उकरिती पुढिला चरणीं । उलथूं पाहती तीष्ष्ण विषाणीं ।
व्याघ्रचर्मांची पडतां घाणी । बळें क्षोभोनि फुंपाती ।
क्षणक्षणा मूत्र पुरीष । करिती दुर्दान्त सप्त वृष ।
तद्दमनार्थ महादावेश । धरूनि परेश उठावला ।
श्रीकृष्ण बैलांशी झुंज देणार ही वार्ता क्षणात सर्वत्र पसरली. अंतःपुरात बातमी पोहोचली. नवरीसह सर्व राजस्त्रिया खिडक्मयातून ते दृश्य पाहू लागल्या. त्याचवेळी राजाने सेवकांना बैल मोकळे सोडण्याची आज्ञा केली. वृषभशाळेचे दरवाजे सेवकांनी उघडताच प्रलयाच्या वेळी प्रत्यक्ष यम बाहेर पडावा तसे ते सात बैल फुत्कारत बाहेर पडले. झुंजीचे कौतुक पहायला नगरातील लोक जमा झाले. ते उंच जाग्यावरूनच ती झुंज पहात होते. अग्निबाण कडाडत उडाले. वाद्यांचा गजर होऊ लागला. वीर आरोळय़ा देऊ लागले. बांबूला व्याघ्राजीन बांधून ते बैलांसमोरून फिरवण्यात आले. व्याघ्रचर्माची घाण त्या बैलांच्या नाकात शिरताच ते जास्तच पिसावले. समोरच्या पायांच्या खुरांनी ते जमीन उकरू लागले. मूत्र विसर्जन करू लागले. फुत्कारू लागले. त्यांचा मुकाबला करायला श्रीकृष्ण सज्ज झाले.
नोवरी मानसीं नवस करी । शिव भवानी कुळेश्वरी ।
मज पावो ये अवसरिं । विजयी हरि हो वृषदमनीं ।
अगा सवितया भास्करा । विश्वचक्षु विश्वंभा ।
धांवें पावें इंदिरावरा । कृष्ण नोवरा मज योजीं ।
अनेकजन्मान्तरिंचें पुण्य । व्रत तप दानें अनु÷ान ।
सफळ हो कां मजलागून । यदुनंदनवरलाभें ।
ते दृष्य पाहून नवरी राजकन्या सत्या मनोमन ईश्वराची प्रार्थना करू लागली-हे शिव भवानी कुळेश्वरी! या प्रसंगी माझ्यावर कृपा कर आणि या झुंजीत श्रीकृष्णांना विजयी कर. अगा सूर्यनारायणा! माझ्यावर कृपा करा आणि कृष्ण माझा नवरा होऊ दे अशी योजना करा. अनेक जन्मांचे माझे पुण्य आज फळाला येऊ दे. माझी सर्व तपे, दाने, व्रते आज सुफळ होऊ दे व मला कृष्ण हाच नवरा म्हणून लाभू दे.








