आई स्वतःच्या मुलांसाठी स्वतः उपाशी राहते. पण तामिळनाडूच्या पोन्नेरी गावातून मनाला डागण्या देणारे वृत्त समोर आले आहे. येथील एका मुलाने स्वतःच्या वृद्ध आईला काटेरी झाडांवर ढकलून पळ काढला आहे.
त्याची आई वेदनेने विव्हळत होती, रडत होती, तिच्या रडण्याचा आवाज परिसरातील लोकांना ऐकू आला तेव्हा त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. महिला या काटेरी झाडांमधून बाहेर पडण्यासाठी तीन तासापर्यंत झगडत होती. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
कितीतरी दिवसांपासून उपाशी

या महिलेचे नाव गांधीमती आहे. ती सेक्कडू मनाली येथील रहिवासी आहे. मागील अनेक दिवसांपासून काहीच खाल्ले नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिची प्रकृती अत्यंत कृश वाटत होती. महिलेची प्रकृती खराब असल्याचे दिसून आल्यावर स्थानिक लोकांनी तिला मदत करण्यासाठी रुग्णवाहिकेला पाचारण केले. पोलीस निरीक्षक प्रेमचंद आणि त्यांच्या पथकाने त्वरित तेथे धाव महिलेला रुग्णालयात पोहोचविले आहे.
मुलांसोबत राहायची महिला
या महिलेला रवि आणि शंकर हे दोन मुलगे आहेत. सर्वप्रथम तिच्या मोठय़ा मुलाने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर ती दुसऱया मुलासोबत राहू लागली. पण नंतर शंकर आणि त्याच्या मित्रांनी वृद्ध महिलेला बाइकवर बसवून येथील काटय़ांमध्ये ढकलून पळ काढला. महिलेने स्वतःच्या मुलांच्या विरोधात तक्रार नोंदविल्यास कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.









