प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाने जशा अनेक सामाजिक समस्या निर्माण केल्या. तशाच कौटुंबिक समस्याही निर्माण झाल्या आहेत. अनेक वृद्धांना त्यांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर काढले असून या वृद्धांना रस्त्यावर अगदी कचराकुंडीच्या बाजूलासुद्धा आश्रय घ्यावा लागत आहे. अशीच वेळ एका वृद्धेवर आली होती. मात्र सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्यामुळे तिला आसरा मिळाला आहे.
सदर 76 वषीय आजी फुले गल्ली, वडगाव येथे 10 दिवसांपासून अक्षरशः कचरा कुंडाशेजारी राहात होत्या. ही बाब कळताच माधुरी जाधव, विनय पाटील व चेतन रेवणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्री रुग्णवाहिका किंवा कोणत्याही वाहनाची सोय न झाल्याने त्यांनी चक्क हातगाडीवर घालून त्या आजीबाईंना जुने बेळगाव येथील निराधार आश्रय केंद्रामध्ये आणून दाखल केले.
गेल्यावषीसुद्धा माधुरी जाधव यांनी अनेक असहाय्य रुग्णांना स्वतः रुग्णवाहिकेतून सुखरूपपणे हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले आहे. तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्या अनेकांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेले होते. आता माधुरी यांच्या पुढाकारामुळे एका वृद्ध महिलेला आसरा मिळाला आहे.









