वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटी रिटर्न) भरण्यापासून सूट देण्याच्या दृष्टीने घोषणा अर्जाला अधिसूचित केले आहे. हा अर्ज ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये जमा करावा लागणार आहे.
2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पेन्शन उत्पन्न आणि त्याच कालावधीत बँकेतील ठेवींवर व्याज मिळविणाऱया 75 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयटी रिटर्न सादर करण्यापासून सूट देण्याची तरतूद होती.
अशा ज्येष्ठ नागरिकांना 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नसेल. पेन्शन जमा होत असलेल्या बँकेतच व्याज उत्पन्न प्राप्त होत असेल तरच प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यापासून सूट मिळणार असल्याचे समजते.
प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत एका निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सर्व लोकांना विवरणपत्र सादर करावे लागते. ज्येष्ठ नागरिक (60 वर्षे किंवा याहून अधिक वयाचे) आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिक (80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे) यांच्यासाठी ही मर्यादा वेगळी असते. कर विवरणपत्र सादर न केल्यास दंड ठोठावला जातो.









