बेंगळूर : मार्चच्या 4 तारखेपासून सुरू होणाऱया राज्य विधिमंडळ अधिवेशनप्रसंगी विधानपरिषदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वृत्तांकनासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत, असे स्पष्टीकरण विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिले आहे. विधानपरिषद सभापती बनल्यानंतर मंगळवारी प्रथमच होरट्टी यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आपण लोकप्रतिनिधी असून सभागृहात चालणाऱया कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी जनतेला अनुकूल करून देणे आमची जबाबदारी आहे. त्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
चार मार्चपासून सुरू होणारे राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत विधानपरिषदेचे कामकाज पाहण्याची सोय करण्यासाठी प्रसारमाध्यमांसाठी नवे नियम जारी करण्याचा विचार सुरू आहे. 2 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देण्यात येईल. सभागृहात मोबाईलसह सर्व इलेक्टॉनिक उपकरणे वापरण्यावर निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. परंतु, प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारे निर्बंध घालणार नाही. मात्र, त्यांच्यासाठी नवे नियम जारी करण्यात येतील, असा पुनरुच्चार सभापती बसवराज होरट्टी यांनी केला.









