नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाविषयी जनजागृतीसाठी देशाच्या कानाकोपऱयांमध्ये वृत्तपत्रे पोहचणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत काही अनेक वृत्तपत्रांची छपाई बंद झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. वृत्तपत्रांनी व नियतकालिकांनी पुन्हा आपले वितरण सुरू करून कोरोनाविरूद्धच्या लढाईत त्यांचे महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. आज अनेक प्रसार माध्यमे उपलब्ध असली तरी वृत्तपत्रांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. कोटय़वधी लोकांसाठी आजही वृत्तपत्रच सोयीस्कर आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या या कालखंडात काय करावे आणि काय करू नये हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वृत्तपत्रांचाच पुढाकार आवश्यक आहे. वृत्तपत्रे पुन्हा सुरू व्हावीत यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. असंख्य वाचकांचीही तीच इच्छा असल्याचे विधान त्यांनी केले.