शंकरगौडा पाटील यांचे प्रतिपादन : खानापूर तालुक्यात भाजपतर्फे 20 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका जंगल संपत्तीने व्यापलेला आहे. सध्या देशामध्ये कोरोना संसर्गाच्या काळात प्राणवायूची मोठी गरज होती. या तालुक्यात जंगल संपत्तीमुळे नैसर्गिक प्राणवायू उपलब्ध होऊ शकतो. हल्लीच्या काळात जंगल संपत्तीचे संवर्धन आणि रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मनोगत दिल्लीमधील कर्नाटक राज्याचे प्रतिनिधी व मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी खानापूर येथे हिंदूनगर कॉलनीमध्ये वृक्ष लागवड समारंभात ते बोलत होते.
प्रारंभी कर्नाटक राज्य वनविकास मंडळाचे सदस्य सुरेश देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून तालुक्यात भाजपच्यावतीने 20 हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याची सुरुवात शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते होत असून आम्ही केवळ झाडे लावण्याचा संकल्प करत नसून ती वाढवण्याचाही निर्धार केला असल्याचे यावेळी सांगितले. हिंदूनगर वसाहतीजवळ असलेल्या 33 गुंठे गावठाण जागेत प्रशासनाच्यावतीने बगीचा तयार करून परिसरातील सौंदर्यात भर टाकली जाणार असल्याची माहिती तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी दिली. यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, भाजपच्यावतीने 20 हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी वनखात्यानेही सहकार्य करावे, अशी विनंती केली.
या कार्यक्रमाला महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, बाबुराव देसाई, वासंती बडगेर, धनश्री सरदेसाई, बसवराज सानिकोप, किरण येळळूरकर, वसंत देसाई, आप्पय्या कोडोळी, गुंडू तोपिनकट्टी, अशोक देसाई, पंडित ओगले, राजेंद्र रायका, जॉर्डन गोन्साल्विस, मल्लाप्पा मारीहाळ, मारुती पाटील, दर्शन खिलारी यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वनकर्मचाऱयांना मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्डचे वितरण
या कार्यक्रमानंतर वनखात्याच्या विश्रामधामात वनखात्याचे गार्ड, फॉरेस्टर, रेंजर यांना कर्नाटक वनविकास मंडळाचे सदस्य सुरेश देसाई यांच्यावतीने मास्क, सॅनिटायझर व फेसशिल्ड देण्यात आले. त्याचे वितरण शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वनसंरक्षण करणे ही केवळ वनखात्याच्या कर्मचाऱयांची जबाबदारी नसून या कामात जनतेचे सहकार्यही महत्त्वाचे असते. खानापूर तालुक्यात वनसंरक्षणासाठी वनकर्मचाऱयांइतकीच सर्वसामान्य जनताही सक्षम असल्याने आजच्या परिस्थितीतही तालुका जंगल संपत्तीने समृद्ध आहे, असे सांगितले.









