त्वरित दुरुस्ती करा : कचऱयाचीही उचल करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या वतीने विविध विभागातील विकासकामे राबविण्यात येत आहेत. कणबर्गी रोडवरील शिवतीर्थ अपार्टमेंट मागील वृंदावन कॉलनीमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
शहरातील बहुतांश उपनगरे विकासापासून वंचित आहेत. कणबर्गी रोडच्या दुतर्फा अनेक कॉलन्या निर्माण करण्यात आल्या आहेत. यापैकी काही मोजक्मयाच उपनगरांचा विकास करण्यात आला असल्याच्या तक्रारी होत आहेत. काही कॉलन्यामध्ये रस्ता, गटारी आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून चकाचक करण्यात आल्या आहेत. मात्र काही कॉलन्या अद्यापही सुविधापासून वंचित आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वाहनधारकांना नाहक त्रास
शिवतीर्थ अपार्टमेंटमागील कॉलनीमधील रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते. पण नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर रस्त्याचे काम करण्यात आले होते. पण रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने दुर्दशा झाली आहे. परिणामी वाहनधारकांना आणि रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विविध वाहिन्या घालण्यासाठी तसेच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. पण रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. रस्ता खराब झाल्याने रहिवाशी व वाहनधारकांचे खूप हाल होत आहेत. तसेच परिसरातील स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून येथील कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याने रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित करावी आणि कचऱयाची ही वेळेत उचल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.