कोरोना संसर्गाची दुसरी लाट : वुहानमध्ये 3 दिवसांत 4 लाख लोकांची चाचणी : जगभरात 48 लाखांहून अधिक बाधित
जगभरात कोरोना विषाणूचा 48 लाख 19 हजार 372 जणांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे. तर 18 लाख 64 हजार 269 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोरोनाबळींचा आकडा 3 लाख 16 हजार 961 वर पोहोचला आहे. चीनमधील कोरोनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या वुहानमध्ये 3 दिवसांत 4 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. संसर्गाची दुसरी लाट समोर आल्यावर सरकारने 14 मेपासून सर्व 1.1 कोटी रहिवाशांची कोरोना चाचणी सुरु केली आहे. स्थानिक प्रशासनाने चाचणी प्रक्रियेला ‘10 दिवसांची लढाई’ असे नाव दिले आहे. वुहानमध्ये आतापर्यंत 50 हजार बाधित सापडले असून 3,800 जणांना जीव गमवावा लागला आहे.
भारतीय मुलीचा गौरव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 10 वर्षीय भारतीय वंशीय मुलीचा गौरव केला आहे. या मुलीने कोरोना विरोधात लढणाऱया फायर फायटर्स तसेच परिचारिकांना कुकीज पुरविल्या आहेत. तसेच ती आरोग्य कर्मचाऱयांना शुभेच्छापत्रे पाठविते. श्राव्या रेड्डी मेरीलँडच्या हनोवर हिल्स एलिमेंट्री स्कुलमध्ये गर्ल स्काउट ट्रूप सदस्य तसेच चौथीत शिकणारी विद्यार्थिनी आहे.
‘आरोग्य’ कोलमडले

ब्राझीलच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तेथे आपत्कालीन बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्वाधिक ग्रस्त साओ पावलो शहराच्या महापौरांनी शासकीय रुग्णालये क्षमतेच्या 90 टक्के भरल्याचे म्हटले आहे. प्रशासन तयारीसाठी गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
रशियात 8,926 नवे रुग्ण

रशियात 24 तासांत कोरोना संसर्गाचे 8,926 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 91 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 2,90,678 बाधित आढळले असून 27,650 जणांचा बळी गेला आहे. संसर्गाच्या प्रकरणी अमेरिकेनंतर रशिया दुसऱया क्रमांकाचा पीडित देश ठरला आहे. रशियात मृत्यूदर मात्र जगात अत्यल्प राहिला आहे.
जाहीर कार्यक्रमात चाचणी

न्यूयॉर्कचे गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी जाहीर कार्यक्रमात कोरोना विषाणूची चाचणी करवून घेतली आहे. चाचणी किती जलद आणि सहजपणे होते हे दाखविण्याचा यामागे उद्देश होता असे क्यूमो यांनी सांगितले आहे. प्रांतात प्रतिदिन सुमारे 40 हजार चाचण्या केल्या जात आहेत. न्यूयॉर्क प्रांतात आतापर्यत 28 हजार 325 जणांचा बळी गेला आहे.
इटलीत संकट ओसरतेय

इटलीत निर्बंध शिथिल करण्यापूर्वी दिवसभरात सर्वात कमी 145 मृत्यूंची नोंद झाली आहे. हा आकडा टाळेबंदी लागू केल्यानंतरचा सर्वात कमी ठरला आहे. इटलीत आता प्रतिदिन मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या कमी होत आहे. तर 24 तासांत 675 नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा 4 मार्चनंतरचा सर्वात कमी आहे. देशात 10 आठवडय़ांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
लस उपलब्ध होईलच असे नाही!

ब्रिटनमध्ये कोरोनाची लस कधीच विकसित न होण्याची शक्यताही आहे. आमचे वैज्ञानिक अथक प्रयत्न करत आहेत, परंतु कोरोनावरील लस तयार करण्यास यश मिळेलच असे नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इंपेरियल कॉलेज ऑफ लंडन या दोन्ही संस्थांसोबत लस तयार करण्यासाठी सरकारने 47 दशलक्ष पौंडची गुंतवणूक केल्याची माहिती ब्रिटनचे व्यापारमंत्री आलोक शर्मा यांनी दिली आहे.
चीनमध्ये 7 नवे रुग्ण
चीनमध्ये मागील 24 तासांत 7 नवे रुग्ण सापडले आहेत. याचदरम्यान 11 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एक आठवडय़ापासून संसर्गामुळे एकाही मृत्यू झालेला नाही. सोमवारी सापडलेल्या 7 नव्या रुग्णांमध्ये 4 जण विदेशातून आलेले नागरिक आहेत. चीनमध्ये विदेशातून आलेल्या एकूण 1,704 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा एकूण आकडा 82,954 झाला असून 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे.
1 कोटी चाचण्या जुलैपर्यंत होणार

देशभरात टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे नाहीत. पुढील दोन महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. स्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी सुरू केली आहे. आगामी दिवसांमध्ये अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. यानुसार जुलैपर्यंत 1 कोटी लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
20 शहरांवर नजर
सरकार आता 20 शहरांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, भोपाळ, इंदोर आणि चेन्नई यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा दर अधिक असलेल्या शहरांमध्ये अधिकाधिक चाचण्या केल्या जाणार आहेत. याचबरोबर चाचणीसंबंधी नव्या धोरणावरही विचार केला जाईल.
पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा
देशभरात 4.3 टक्के लोक चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळत आहेत. दर 100 चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सुमारे 12 जण पॉझिटिव्ह आढळत आहेत. दिल्लीत हा आकडा 9 टक्के आहे. या राज्यांनंतर गुजरात (7.8 टक्के), छत्तीसगड (6 टक्के), तेलंगणा (5.4 टक्के), मध्यप्रदेश (4.9 टक्के) आणि पश्चिम बंगाल (4.6 टक्के) यांचा क्रमांक लागतो.
औषध शोधल्याचा बांगलादेशी डॉक्टरांचा दावा
किटकनाशक अन् अँटीबायोटिक अँटीडॉटने आजार बरा

बांगलादेशी डॉक्टरांच्या एका पथकाने कोविड-19 वरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. या पथकाने दोन औषधे एकत्रित करून अँटीडॉट तयार केला आहे. या औषधाचे रुग्णांवरील परिणाम चकीत करणारे आहेत. 60 बाधितांवर या औषधाचा वापर करण्यात आला असून त्याचे परिणाम सकारात्मक आले आहेत. दोन औषधांचा अँटीडॉट देण्यात आल्यावर सर्व रुग्ण बरे झाल्याची माहिती बांगलादेश मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक मोहम्मद तारिक आलम यांनी दिली आहे.
किटकनाशक औषध आयवरमेक्टिनच्या सिंगल डोजसह अँटीबायोटिक डॉक्सीसायक्लिन एकत्रित करून अँटीडॉट तयार करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णांना हेच औषध देण्यात येत असल्याचे तारिक म्हणाले.
या औषधाच्या वापरानंतर 4 दिवसांत बाधित संसर्गातून मुक्त झाले आहेत. तसेच औषधाचा कुठलाही साइड इफेक्ट दिसून आलेला नसल्याचे तारिक यांनी सांगितले आहे. बांगलादेशात कोरोनाचे 22 हजारांहून अधिक बाधित सापडले असून 238 जणांचा मृत्यू झाला आहे.
3 दिवसांत 50 टक्के लक्षणे घटली
संबंध्घ्ति औषध देण्यात आल्यावर 3 दिवसांत कोरोना बाधितांच्या लक्षणांमध्ये 50 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. तसेच या रुग्णांचा 4 दिवसांत चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पथकात कार्यरत डॉक्टर रबिउल मोर्शीद यांनी दिली आहे.









