अलिकडेच वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत नवी दिल्ली येथून चीनच्या वुहान येथे गेलेले 19 भारतीय प्रवासी चाचणीत कोरोनाबाधित आढळले आहेत. या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत चीनमध्ये पोहोचलेल्या एअर इंडियाच्या विमानात पहिल्यांदाच एवढय़ा संख्येत बाधित आढळले आहेत. चीनच्या वुहानमधूनच मागील वर्षी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता.
तर भारताने चीनसाठी 13 नोव्हेंबरपासून आणखीन 4 उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .यातील तीन उड्डाणे 13, 20 आणि 27 नोव्हेंबर रोजी तर एक उड्डाण चार डिसेंबर रोजी होणार आहे. याचे प्रवासभाडे एअर इंडिया निश्चित करणार आहे. प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून निश्चित दिशानिर्देशांचे पालन करावे लागणार आहे. याचबरोबर प्रवासापूर्वी त्यांना कोरोनाची चाचणी करवून घ्यावी लागणार आहे.
30 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून वुहान शहराकरता विमानसेवा आयोजित करण्यात आली होती. विमानतळावर चाचणीदरम्यान 19 भारतीय बाधित आढळले आहेत. हे सर्व प्रवासी चीनला रवाना होण्यापूर्वी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घेऊन विमानात दाखल झाले होते. यातील 39 जणांच्या चाचणीत अँटीबॉडी दिसून आल्या आहेत.









