उचगांव / वार्ताहर
गँगस्टर रवी पुजारी व बिशनोई गँगचे नाव सांगून गांधीनगर येथील कापड व्यापाऱ्याकडे वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व गांधीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुसक्या आवळल्या.
याप्रकरणी सुमित सेवकराम अडवाणी (वय २९) व अजय अशोकलाल वलेछा (वय२४) दोघेही राहणार गांधीनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबतची फिर्याद हरेशलाल भावनदास नरसिघांनी रा. मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी हरेशलाल यांचे गांधीनगर मुख्य रस्त्यावर हरेशकुमार अँड कंपनी नावाचे कपड्याचे होलसेल दुकान आहे. साधारण एक महिन्यापूर्वी हरीश लाल यांच्या मोबाईलवर प्रथम बिश्नोई गँगचा एक्झीकुटर बोलतोय असे सांगून व कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी यांच्या नावाने फोन करून वीस लाखांची खंडणी मागितली.
सुरुवातीला हरेशलाल नरसिंघानी यांनी भीतीपोटी तो फोन नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. त्यानंतर हरेशलाल व त्यांचा मुलगा सुमित याच्या व्हाट्सअप वर धमकीचे मेसेज पाठवून खंडणी मागण्यात सुरुवात केली. जर पैसे नाही दिले तर घरातील मुलांना व नातवांना पळवुन नेईन अथवा त्यांच्या जीवाचे बरे वाईट करीन,गांधीनगरात धमाका करेन अशा मजकुराचे मेसेज त्यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर टाकले. याचा त्रास वारंवार होत असल्याने हरेशलाल यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना भेटून खंडणी मागणारे इसमा बाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक सावंत यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना या घटनेची माहिती दिली. जिल्हाप्रमुख बलकवडे यांनी याबाबत सखोल चौकशी करून संबंधित संशयीतांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान धमकीचे येणाऱ्या फोन नंबराद्वारे व मेसेज द्वारे सायबर क्राईम द्वारे माहिती घेऊन व गोपनीय बातमीदार कडून गांधीनगर येथीलच रेकॉर्डवरील गुन्हेगार सोबत वावरणारे अजय वालेछा व सुमित अडवानी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कर्नाटक येथील ओळखीच्या इसमाकडून सिमकार्ड घेऊन त्या फोन द्वारे हरेशलाल नरसिंघानी यांना गॅंगस्टर रवी पुजारी व बिश्नोई गँगचा नावाने खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि सतराज घुले, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम ,कृष्णात पिंगळे ,राजू बंदरे, मोहन गवळी, आकाश पाटील, सागर कांडगावे, संजय पडवळ, संतोष पाटील, सायबरचे पोलीस कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांनी गांधीनगर पोलीस व एलसीबी यांनी संयुक्तरीत्या कामगिरीत भाग घेतला.
दरम्यान संशयित आरोपी सुमित सेवकराम आडवाणी व अजय अशोकलाल वलेछा यांना बावड्यातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर व्ही. सी. द्वारे हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम करत आहेत.









