मायावतीने प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या दिली. तेव्हा प्रद्युम्न शंबरासुराकडे जाऊन त्याच्यावर असे असह्य आरोप करू लागला की, त्यामुळे त्याने भांडण काढावे. त्यानंतर त्याने त्याला युद्धासाठी आव्हान दिले.
तो कंदर्प दर्पाथिला । यदुकुळसंभव शौर्यागळा ।
नवयौवनें विराजला । पुरुषचिह्नीं प्रतापी ।शंबरातें समराङ्गणीं । निर्भर्त्सूनि बोले कार्ष्णि । मंडित अससी पुरुषचिह्नीं । तरी उठोनि येईं पुढें ।जंववरी भेटला नाहीं वीर । तंववरी विक्रम वाहसी थोर। आतां सांवरूनियां धीर । येईं सत्वर समरंगा ।यदुकुळात जन्मलेला महापराक्रमी, यौवनात आलेला कामदेव शंबरासूराची निर्भर्त्सना करत त्याला म्हणाला-हे शंबरासूरा! तू स्वतःला पुरुष समजत असशील तर रणांगणात ये. जोपर्यंत कोणी प्रतिस्पर्धी वीर सापडत नाही तोपर्यंत शौर्याच्या पराक्रमाच्या वल्गना केल्या जातात. तू खरा शूर वीर असशील तर समरांगणात ये. तो आधींच शंबरासुर। रुद्रक्रोधाचा अवतार । विशेष ऐकोनि स्वाधिकार। क्षोभें दुर्धर उठावला । सर्प खवळलिया चरणघातीं। तेंवि ऐकोनि स्मरदुरुक्ति। गदा पडताळूनियां हातीं। अधर दांतीं रगडिला। खदिराङ्गारासदृश नेत्र। क्रोधावेशें कांपे गात्र। जैसें काळकूटाचें पात्र। तैसा दुष्कर निघाला। शंबरासूर सामान्य का होता? महारुद्र शिवाच्या क्रोधाचा तो अवतार! प्रद्युम्नाने दिलेले आव्हान ऐकून पायाने डिवचलेल्या सापासारखा चिडला. तो क्रोधाने भडकला. आपली गदा त्याने हातात घेतली. खालचा ओठ दाताने चावला. त्याचे डोळे निखाऱयासारखे लाल झाले. क्रोधाने त्याचे अंग थरथरू लागले. काळकूट विषाचे जणू पात्रच असावे असा तो आता युद्धासाठी बाहेर आला. त्याने आपली गदा वेगाने फिरवून प्रद्युम्नावर फेकली आणि विजेच्या कडकडाटासारखी गर्जना केली.
शंबरासुराचा गदाप्रहार । येतां वक्षस्थळासमोर ।
गदाहस्तें करूनि दूर। सवेग असुर ताडिला । शंबरासुरा स्वगदाघातें। हृदयीं भेदूनियां मन्मथें । गर्जना करितां पाहे भंवतें। दैत्य मूर्च्छेतें पावतां । ऐकें कौरवकुळपाळका। दैत्या हृदयें बाधी शंका । म्हणे कोण कोठूनि हा त्र्यंबका। अकस्मात पाठविला।वीर नव्हे हा सामान्य । वय पाहतां दिसे सान । कृतान्तही आंगवण । करितां गौण यासमरिं ।ऐसा विस्मय करूनि मनीं । स्वगुरु मयासुर चिंतूनी । सत्वर उडोनि गेला गगनीं । तें ऐकें श्रवणीं कुरुवर्या ।
महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला सांगतात-परिक्षिता! भगवान प्रद्युम्नाने आपल्या वक्षस्थळावर वेगाने येणारी शंबरासूराची गदा आपल्या गदेच्या तडाख्याने तटवली. एक प्रचंड आरोळी ठोकली व आपली गदा त्याच्यावरच वेगाने फेकली. प्रद्युम्नाच्या गदेच्या प्रहाराने शंबरासूराचे हृदय विदीर्ण झाले. तो काही काळ मूर्च्छित पडला. सावध होता होता तो मनोमन विचार करू लागला-हा कोण? कोठून आला? अकस्मात कोणी पाठवला? हा सामान्य वीर तर दिसत नाही. याचे वय लहान वाटते. पण हा प्रत्यक्ष यमापेक्षाही बलवान वाटतो.








