प्रतिनिधी/ धारबांदोडा
सुकतळी-मोले येथे होऊ घातलेल्या तमनार वीज प्रकल्पाला स्थानिकांचा पूर्ण पाठींबा असून विरोध असल्याचे जे भासविले जाते, ते चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. फळसकाटा, माकडये, सांगोड, सुकतळी या भागातील नागरिकांचा वीज प्रकल्पाला पूर्ण पाठींबा आहे. स्थानिकांच्या व गोव्याच्या हिताचा हा प्रकल्प असून जे विरोध करतात ते गावाशी संबंधीत नाहीत, अशी माहिती स्थानिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सुकतळी येथील नियोजित प्रकल्पाबद्दल स्थानिकाची भुमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ही पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. मोले पंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र प्रभूदेसाई म्हणाले, सांगोड गावात येणारा हा प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचाच आहे. गावातील युवकांना त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल. शिवाय वारंवार होणाऱया खंडीत वीजेचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे. सध्या जे लोक प्रकल्पाविरोधात आंदोलन करतात त्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेताच ही कृती सुरु केली आहे. मोले पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांना या प्रकल्पापासून कुठलीच हानी नाही. उलट गावातील 12 लोकांना कायम स्वरुपी तर 80 जणांना हंगामी नोकऱया देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. भाजपा सरकार कुठलाही प्रकल्प आणू पाहिल्यास त्याला विनाकारण विरोध करणे हे विरोधकांचे धोरणच बनले आहे अशी टिकाही त्यांनी केली.
स्थानिक युवक देवेंद्र सांगोडकर म्हणाले मागच्यावेळी या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिकांना आपली बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत गोंधळ घातला. त्यामुळे स्थानिकांना आपली भुमिका मांडता आली नाही. प्रकल्पाचे खरे स्वरुप कळल्यानंतर स्थानिकांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. असे ते म्हणाले. सध्या गोव्याला 700 ते 800 मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर गोमंतकीयांना त्याचा फायदा होणार आहे. 90 टक्के लोकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे. कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याची जी हमी दिली आहे, त्यानुसार रोजगार न मिळाल्यास स्थानिकांकडून विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आरमांद मिस्किता म्हणाले, पूर्वी या प्रकल्पाबद्दल आपला संभ्रम होता. आपण शेतकरी असल्याने शेती व्यावसायावर त्याच परिणाम होऊ नये यासाठी प्रकल्पविरोधात भुमिका घेतली होती. मात्र स्थानिक आमदार व बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी हा संभ्रम दूर केला. सध्या सामाजिक माध्यमांवर मोठय़ाप्रमाणात या प्रकल्पाविरोधात काही बिगर सरकारी संस्थाकडून अपप्रचार सुरु आहे. पर्यावरणप्रेमींना खरोखरच कळवळा होता तर प्रत्यक्ष झाडे कापण्यात आली तेव्हा त्यांनी विरोध का केला नाही ? असा सवाल शिवाजी फाटम यांनी उपस्थित केला. सुकतळी भागातील 95 टक्के युवक बेरोजगार आहेत. त्यापैकी किमान काहीजणांना या प्रकल्पामुळे रोजगार मिळेल. तुकाराम झोरे यांनी हा प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा असल्याचे सांगून, भविष्यात एखादा कारखाना आल्यास या विजेचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. मयूर शेट वेरेकर यांनीही प्रकल्पाचे स्वागत केले. माजी पंचसदस्य विश्रांती गावकर यांनी प्रकल्प गावाच्या फायद्याचा असल्याने त्याला विरोध करणे योग्य होणार नाही असे स्पष्ट केले. जास्तीतजास्त युवकांना या प्रकल्पात रोजगार देण्याची मागणीही त्यांनी केली.









