प्रतिनिधी / इचलकरंजी
राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारा वीज दर कपातीचा निर्णय घेतला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने याबाबतचे नियोजन केले आहे. या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कपात करण्यात आलेले वीज दार 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 5 ते 7 टक्के, व्यावसायिक ग्राहकांसाठी 10 ते 12 टक्के तर औद्योगिक वीज ग्राहकांसाठी 10 ते 11 टक्के दरकपात होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार मुंबई व उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दर कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी महावितरणकडून वीज दर कमी केले जातील. या मध्ये शेतीसाठी 1 टक्क्याने दर कपात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा
संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सर्वाधिक वीज दर आहे. याबाबत वेळोवेळी महाराष्ट्र शासन व वीज नियामक आयोगाकडे तक्रार केली होती. राज्यातील महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर वाढीसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची या प्रस्तावावर सही होती. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड दशकामध्ये वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच वीज दर कपातीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना नक्कीच दिलासा देणारा आहे.
- विनय महाजन (उद्योजक, इचलकरंजी)