प्रतिनिधी / धारबांदोडा :
सुकतळी-मोले येथे होऊ घातलेल्या वीज ट्रान्समिशन प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत मोठा गदारोळ माजला. नियोजित प्रकल्प त्याच ठिकाणी होणार असून प्रत्यक्ष वीज वाहिन्या टाकताना स्थानिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा विचार करुन काम हाती घेण्यात येईल. प्रकल्प गोव्याच्या हिताचा असून हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले. तर पर्यावरणीयदृष्टय़ा हा प्रकल्प घातक असून त्याला कायम विरोध असल्याची भूमिका विरोधकांनी मांडली.
माकडये-मोले येथील महादेव सभागृहात अत्यंत तंग वातावरणात शनिवारी सायंकाळी ही बैठक झाली. बैठकीच्यास्थळी मोठय़ाप्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बैठकीला वीजमंत्री निलेश काब्राल, स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, तानमर कंपनीचे प्रकल्प अधिकारी श्री. पिकळे, मोले पंचायतीच्या सरपंच तन्वी केरकर, उपसपंच सुशांत भगत, पंचसदस्य समर कदम, राजेश सांगोडकर, रामकृष्ण गावकर, स्नेहलता नाईक, बाबू शेळके, मामलेदार शर्मिला गावकर, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर आदी उपस्थित होते.
प्रकल्प गोव्याच्या हिताचा : मंत्री दीपक पाऊसकर
कंपनीचे प्रकल्प अधिकारी श्री. पिकळे हे प्रकल्पाबद्दल माहिती देण्यासाठी उभे राहिले असता, त्यांना जोरदार विरोध करीत, प्रथम आमदार दीपक पाऊसकर यांनी या प्रकल्पासंबंधी माहिती द्यावी, अशी मागणी कृष्णा झोरे या स्थानिक युवकाने केली. त्याला अनुसरुन मंत्री पाऊसकर यांनी हा प्रकल्प मोलेवासियांच्या हिताचा असल्याचे सांगितले. सुरुवातील दहा स्थानिकांना कंपनीतर्फे रोजगार मिळणार असल्याचे सांगून सुमारे 80 युवकांना कंत्राटी पद्धतीवर नोकऱया मिळतील असे त्यांनी जाहीर केले. वाहिन्या टाकण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. पुन्हा एकदा पाहणी करुन लोकांची अडचण होत असल्यास त्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. काही लोक स्थानिकांची दिशाभूल करीत असून त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
वीज पुरवठय़ात गोवा स्वावलंबी होणार : पिकळे
श्री. पिकळे यांनी प्रकल्पाबद्दल माहिती देताना, सध्या गोव्यात विजेची कमतरता भासत असल्याचे सांगितले. वर्षाकाठी 3 टक्के विजेची अतिरिक्त गरज वाढत असून भविष्यात विजेची टंचाई भासणार आहे. या प्रकल्पामुळे कोणताच दुष्परिणाम होणार नसून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोवा राज्य वीज पुरवठय़ात स्वावलंबी होणार आहे. चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प छत्तीसगडहून कर्नाटकमार्गे गोव्यात येणार आहे. सुकतळी मोले येथे वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तेथून म्हापसा व शेल्डे केपे येथील वीज प्रकल्पाला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वीज पुरवठय़ासाठी केवळ दोन फिडर बसविण्यात येणार असून 500 मेगा व्हॅट क्षमतेचे दोन ट्रान्स्फॉर्मर बसण्यात येणार आहे. सन 2018 सालापासून या प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वनखात्याने या प्रकल्पाला मान्यता देताना केवळ 8010 झाडे कापण्याच्या अटीवर परवानगी दिली असून त्यानुसार आत्तापर्यंत 5500 झाडांची नव्याने विविध ठिकाणी लागवड केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकल्पासाठी जी झाडे कापली जातील त्याच्या तीनपट अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री काब्राल यांना बोलण्यास आक्षेप
मंत्री निलेश काब्राल हे बोलण्यासाठी उभे राहिले, असता त्यांनाही विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. मंत्री काब्राल यांनी प्रकल्पासंबंधी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोले प्रकल्पाला विरोध करणाऱयांना देशद्रोही असे संबोधीत केले होते. त्यामुळे त्यांनी प्रकल्पाला विरोधक करणारे देशद्रोही कसे हे स्पष्ट करावे व नंतरच प्रकल्पावर आपले विचार मांडावेत अशी मागणी करण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच त्यांनी आपली बाजू मांडताना हा प्रकल्प गोव्याच्या हितासाठी असल्याचे सांगितले. सावर्डे मतदार संघात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो व लोक त्याबद्दल वारंवार आपल्याला फोन करतात. या प्रकल्पामुळे भविष्यात ही परिस्थिती राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण व मानवी सुरक्षेची लेखी हमी द्या : कृष्णा झोरे
स्थानिक युवक कृष्णा झोरे यांनी आपली बाजू मांडताना, श्री. पिकळे यांनी प्रकल्पामुळे कुठलेच दुष्परिणाम होणार नसल्याचा मुद्दा खोडून काढला. या प्रकल्पामुळे मानवी आरोग्यावर संथ गतीने परिणामा होणार असून कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची भिती व्यक्त केली. त्यामुळे अशा दुष्परिणामाविरोधात सर्वांची सुरक्षा आवश्यक आहे. त्यावर कंपनी कोणती उपाययोजना करणार आहे, हे लेखी स्वरुपात देण्यात मागणी केली. जोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत प्रकल्पाला विरोध कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच तन्वी केरकर, उपसरपंच सुशांत भगत, राजेश सांगोडकर यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी हा प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा असल्याचे सांगितले. गोयचो एकवट संघटनेचे उपाध्यक्ष ज्युलियो आगियार, ट्रिपोलो सौझा, प्रसाद पांगम, वामन खांडेपारकर, मोहन गावकर, रमाकांत गावकर यांनी चर्चेत भाग घेतला. अनिल सावंत यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती देणारी पुस्तिका उपलब्ध आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. दामोदर शिरोडकर यांनी ज्याठिकाणी प्रकल्प होत आहे, तेथे नैसर्गिक जलस्रोत आहेत. रानटी जनावरे पाणी पिण्यासाठी त्यावर अवलंबून आहेत. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यावर ही जनावरे पाण्यासाठी गावात येणार आहेत. त्यावर कोणती उपाययोजन आखलेली आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पर्यावरणाच्या मुद्दय़ावर तडजोड नाही : प्रजल साखरदांडे
पर्यावरणप्रेमी प्रजल साखरदांडे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी या प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना, तानमर कंपनी जे सांगत आहे, ते सपशेल खोटे असल्याचे सांगून स्थानिकांना नोकऱया देण्याचे ते आमिष दाखवित असल्याचे सांगितले. मात्र अशा प्रकल्पात कायमच्या नोकऱया दिल्या जात नाहीत. मोले हा निसर्गसंपन्न भाग आहे. पर्यावरणाचे जतन करणे आपले कर्तव्य असून या प्रकल्पाला आमचा कायम विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
शेतकरी आरमांद मिस्किता यांनी आपल्या शेतातून वीज वाहिन्या ओढण्यासाठी झाडांवर आपल्याला न सांगताच क्रमांक टाकण्यात आल्याचा खुलासा केला. त्यांच्या या प्रश्नावर कंपनी प्रतिनिधी कोणतेच उत्तर द्यायला तयार नव्हते. शेतकऱयांचे नुकसान होऊ नये अशी मागणी त्यांनी केली.









