दोन वर्षांचा कारावास : 21 हजार रुपये दंड
प्रतिनिधी/ बेळगाव
रामदुर्ग तालुक्मयातील कल्लापूर येथील शेतकऱयाने शेतामध्ये विद्युत ट्रान्स्फॉर्मर बसवून त्या माध्यमातून वीज घेतली होती. मात्र, त्या शेतालाच लागून असलेल्या एका शेतकऱयाने अनधिकृतरीत्या त्या खांबावरून वीज घेतली असता त्याचा प्रवाह जमिनीत रोवण्यात आलेल्या तारेमध्ये गेला होता. त्या तारेला धरल्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपीला दोन वर्षांचा कारावास आणि 21 हजारांचा दंड अशी शिक्षा पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने सुनावली आहे.
मयत हणमंतगौडा शिवनगौडा पाटील या शेतकऱयाने इतर शेतकऱयांच्या संमतीने संयुक्तरीत्या शेतामध्ये वीज घेतली होती. या शेतकऱयांच्या शेताला लागून आरोपी शिवनगौडा हणमंतगौडा पाटील (वय 70) याचे शेत आहे. त्याने अनधिकृतरीत्या त्या वीज खांबावरून वीज चोरून मोटारीला जोडली होती. त्यावेळी खांबाला लावलेल्या तारेमध्ये वीजप्रवाह सुरू होता. मयत हणमंतगौडा हे तेथे जाताना त्यांना त्या तारेचा स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपी शिवनगौडा हणमंतगौडा पाटील याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी 13 साक्षी, एक मुद्देमाल तपासण्यात आला. त्यामध्ये आरोपी शिवनगौडा हणमंतगौडा पाटील हा दोषी आढळल्याने त्याला वरील शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून विद्यासागर दरबारे यांनी काम पाहिले.









