पालसरे केरी येथील घटना
प्रतिनिधी / फोंडा
वीज खंडीत झाल्याची तक्रार माशेल येथील वीज केंद्रावर देण्यासाठी पालसरेहून माशेल येथे दुचाकीने जाताना अचानक रस्त्यावर वीजेचा खांब कोसळल्याने दुचाकीचालकाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. किशोर उर्फ केशव जगन्नाथ नाईक (47) असे त्याचे नाव आहे. सदर घटना काल रविवारी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली. दुचाकीच्या पाठिमागे बसलेला श्याम पोकू नाईक (40) हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वादळी वाऱयामुळे गुल झालेली वीजसंबंधी तक्रार देण्यासाठी किशोर व श्याम दोघेही जीए 05 एच 9758 स्कूटरने पालसरेहून माशेल येथे जात होते. काही अंतरावर पालसरे येथेच वीजेचा खांब चालत्या वाहानावर अचानक कोसळल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले. दोघांच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार झाला, त्यात उपचारासाठी नेत असताना किशोर मृत्यू झाला. बेतकी आरोग्य केद्रातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला. किशोर हा सार्वजनिकक बांधकाम खात्यात कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी व पुत्र असा परिवार आहे. वादळी वाऱयाच्या तडाख्यात फोंडा तालुक्यात एकूण पन्नासहून जास्त वीज खांब कोसळले असून वीजेसंबंधी तक्रार नेंदविण्यासाठी जात असतानाच किशोर यांच्यावर प्रुर काळाने झडप घालून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या सावटात पत्नी व मुलांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे. दुचाकीच्या पाठिमागे बसलेला श्याम यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.









