प्रतिनिधी /पेडणे
वीज खात्याचा अजब कारभार पुन्हा एकदा काल शुक्रवारी उघडकीस आला. मांद्रेतील एका ग्राहकाला सकाळी तब्बल 57 लाखांचे बिल पाठविले. दिवसभर त्यावरुन राज्यात वीज खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्यात आल्यानंतर सायंकाळी खात्याने स्वतःची चूक सुधारली आणि चुकीवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
वीज खात्याने देऊळवाडा मांदे येथील केशव मंगेश मांदेकर यांना एका महिन्याचे वीज बिल तब्बल 57 लाख 36 हजार रुपये इतके पाठविले होते. मांदेकर यांचा घरगुती वीज मीटर आहे. त्यांना नियमित सरासरी 800 रुपये प्रतिमाह इतके बिल येत असताना लाखेंचे बिल पाठवून वीज खात्याने त्यांना ‘शॉक’ दिला.
अधिक बील कधी आले नाही. मात्र, ऑक्टोबर महिन्याचे बिल तब्बल 57 लाख 36 हजार 285 रुपये इतके आल्याने त्यांना धक्काच बसला. मांदेकर यांच्या कुटुंबाने तात्काळ आगरवाडा येथील उपविभागीय वीज कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱयांकडे तक्रार केली. त्यानंतर सायंकाळी वीज खात्याने त्यांचे ते अजब बिल मागे घेतले आणि त्यांना 538 रुपयांचे बिल देऊन स्वतःची चूक सुधारली आहे.









