शहापूर येथील प्रकाराने नागरिकांचा जीव धोक्यात : मनपा-हेस्कॉममध्ये तू तू-मैं मैं
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूरच्या बॅ. नाथ पै सर्कलपासून ते खासबाग कॉर्नर या रस्त्याच्या दुभाजकावर विद्युत खांब टाकण्यात आले आहेत. 8 ते 9 महिन्यांपासून या ठिकाणी हे खांब टाकण्यात आले आहेत. परंतु ते उचलण्यासाठी हेस्कॉम वा मनपा पुढे येत नसल्यामुळे याचा फटका स्थानिकांना बसत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खांब दृष्टीस न पडल्याने अपघात होत असतानाही ते खांब हटविले का जात नाहीत, असा प्रश्न शहापूर-खासबागचे रहिवासी विचारत आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात येत आहेत. बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून बॅ. नाथ पै सर्कलपर्यंतच्या मार्गावरील जुने विद्युतखांब काढून त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह खांब बसविण्यात आले. 8 ते 9 महिन्यांपूर्वी हे खांब काढण्यात आले होते. काढलेले खांब खासबाग मार्गावरील दुभाजकावर टाकण्यात आले आहेत. एक भाग स्मार्ट करण्यासाठी दुसऱया भागात आणून खराब झालेले खांब टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात अडचण होत आहे.
खासबाग येथून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. दुभाजकावरील झाडे वाढल्यामुळे पथदिपांचा प्रकाश पुरेसा रस्त्यावर येत नाही. त्यातच हे खांब रात्रीच्यावेळी दृष्टीस न पडल्याने अपघात घडत आहेत. खासबागच्या बाजाराला पुन्हा सुरुवात झाली आहे. बाजाराला येणाऱया नागरिकांनाही या खांबांचा त्रास होत आहे. भाजी विपेत्यांनाही धोका निर्माण झाला आहे.









